Aurangabad News: नाशिक जिल्ह्यातून विसर्ग केल्या जाणाऱ्या पाण्याची आवक जायकवाडी धरणात सुरूच असल्याने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी घेतला जाऊ शकतो. जायकवाडी धरण 76 टक्के भरले असून, 79 टक्के झाल्यावर पाणी सोडण्याच्या हालचाली केल्या जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान जायकवाडी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी यांना तातडीचे पत्र लिहले असून, संबंधीत यंत्रणांना खबरदारी घेणेबाबत आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना पत्र...
जायकवाडी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, जायकवाडी प्रकल्पात 73.97 टक्के जिवंत पाणी साठा आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असुन त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे जायकवाडी धरणात पाणी येत असल्याने धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे जलाशय प्रचलन-आराखड्यानुसार (Reservoir Operation Schedule) आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करावयाचे असल्याने अशीच आवक चालु राहिल्यास, नजीकच्या काळात कधीही धरणाच्या गेटमधून-सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्ये पुरपाणी सोडावे लागणार आहे.
त्यामुळे गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहणेबाबत आवाहन करण्यात यावे. तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर साहित्य तात्काळ काढुन घेण्याबाबत. तसेच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, याबाबत संबंधित गावांना तात्काळ सावधानतेचा इशारा देणे तसेच संबंधीत यंत्रणांना खबरदारी घेणेबाबत आपल्या स्तराहुन आदेश देण्यात यावेत, अशी विनंती जायकवाडी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
गोदाकाठच्या 1522 गावांना इशारा...
मराठवाड्यातील तब्बल 1522 गावे गोदाकाठी वसलेली आहे. त्यामुळे या सर्व गावांना पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता लक्षात घेता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 43 गावे, जालना 178 गावे, परभणी 286 गावे, हिंगोली 70 गावे, नांदेड 337 गावे, बीड 306 गावे, लातूर 158 गावे आणि उस्मानाबादच्या 144 गावांचा समावेश आहे.
जायकवाडीची आताची परिस्थिती...
जायकवाडी धरणातील पाणीसाठा 76 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी हा पाणीसाठा 35.48 टक्क्यांवर होता. धरणात अजूनही 29 हजार 859 क्युसेकने आवक सुरूच आहे. धरणात सद्या पाण्याचा जिवंतसाठा 1649.020 दलघमी आहे.