Nitin Gadkari :  महाराष्ट्रातील पाच पैकी दोन ज्योतिर्लिंग राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात येणार आहेत. पुण्यातील खेड-भीमाशंकर आणि औरंगाबादमधील खुलताबाद-घृष्णेश्वर-वेरूळ राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. 


राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीतून देशातील तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळांचा विकास साधत असताना प्राचीन शंकराचे मंदिर आणि महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या तीर्थस्थळी येणाऱ्या भाविकांच्या आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी खुलताबाद - घृष्णेश्वर -वेरूळ या राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. याबरोबरच पुण्यातील खेड-भीमाशंकर राज्य रस्त्यास देखील राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी केली आहे. 


खुलताबाद-घृष्णेश्वर-वेरूळ हा राज्य महामार्ग सहा किमी लांबीचा असून या महामार्गामुळे जगप्रसिद्ध वेरुळ लेणी आणि अजिंठा लेणी वर्तुळ शक्य होईल. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना ऐतिहासिक वारसा असलेले घृष्णेश्वर मंदिर तसेच मंदिरापासून जवळच असलेल्या वेरूळ-अजिंठा लेण्यांची प्रसिद्ध गुहा या स्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 






औरंगाबाद आणि अजिंठा ही दोन महत्त्वाची शहरे या महामार्गामुळे जोडली जातील. या महामार्गामुळे परिसरातील पर्यटन, शैक्षणिक, विशेष आर्थिक क्षेत्रांचा विकास होऊन हा ऐतिहासिक वारसा जगाच्या पटलावर पोहोचवण्यास मदत होईल, असे ट्विट नितीन गडकरी यांनी केले आहे.  


भारताच्या विविध भागात 12 ज्योतिर्लिंग आहेत. या ज्योतिर्लिंगांपैकी पाच महत्वाची ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. यातील दोन ज्योतिर्लिंग आता राष्ट्रीय महामार्गावर आणण्यात आली आहेत. 


महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग 
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. तर आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणारे खेड- भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि औरंगाबाद जिल्ह्यामधील खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथे ज्योतिर्लिंग मंदिर आहेत. उर्वरित तीन  ठिकाणे देखील लवकच राष्ट्रीय महामार्गाने जोडली जातील अशी शक्तता आहे. 
   


महत्वाच्या बातम्या


Nitin Gadkari : खेड-भीमाशंकर राज्य रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा; नितीन गडकरींची घोषणा