Aurangabad News: औरंगाबाद (Aurangabad) येथील अजिंठा लेणी पाहण्याचं पुढील आठवड्यात नियोजन करण्याचा विचार करात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील दोन लेण्या 22 ते 24 जानेवारीला बंद असणार आहे. चित्रांचे संवर्धन करण्यासाठी लेणी क्रमांक 16 आणि 17 मध्ये ‘फ्युमिगेशन’ करण्यात येणार असल्याने, या लेण्या पर्यटकांसाठी 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी बंद असतील. तर 25 जानेवारीपासून या लेण्या पर्यटकांना पाहता येणार आहे.
किडे, सूक्ष्म जिवांपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान अजिंठा शाखेच्या रसायनशास्त्र शाखेतर्फे 22 ते 24 जानेवारीदरम्यान लेणी क्रमांक 16 आणि 17 मध्ये इफाॅक्साईड वायू सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या फ्युमिगेशननंतर 36 तास लेणी हवाबंद ठेवावी लागते. त्यामुळेच या तीन दिवसांत पर्यटकांना दोन्ही लेण्या बघता येणार नाहीत. हे संपूर्ण काम उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार, अखिलेश भदोरिया, अनुपमा महाजन, नीलेश महाजन यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी देखील लेणी क्रमांक 1 आणि 2 चे काम करण्यात आले होते.
काय आहे दोन्ही लेण्यात?
लेणी क्र.16: या लेणीत गौतम बुद्ध यांच्या जीवनातील घटना दाखविण्यात आल्या असून, येथील कथकली नृत्याची चित्रे उल्लेखनीय आहेत. तर आत बुद्धांची भव्य मूर्ती आहे. सोबतच परलम्बापर मुद्रा, हत्ती, घोडे, मगर यांचीही चित्रे येथे कोरलेली आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी छतावरही सुंदर चित्रकला पाहायला मिळतात.
लेणी क्र. 17: या लेणीत देखील बुद्धाच्या जीवनातील प्रसंग कोरल्याचे दिसून येतात. तसेच आतमध्ये बुद्धांची मूर्ती असून, भगवान बुद्ध आपली पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांच्याकडे भिक्षा मागत असल्याचे प्रसिद्ध चित्र या लेणीत आहे. याच लेणीत पूर्वजन्मी बुद्ध अनेक सोंडांचा हत्ती असल्याचे चित्रही असून, येथील छतावर परीकथा चित्रित केल्या आहेत.
तीन दिवसीय वेरूळ-अजिंठा महोत्सव
यंदाचं वेरूळ-अजिंठा महोत्सव 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवासाच्या आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. लोकसहभाग, प्रायोजकांच्या माध्यमातून तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी बासरी वादक पंडित राकेश चौरसिया, गायक महेश काळे, राहुल देशपांडे, हरिहरन, शंकर महादेवन, शुजातखाँ, ड्रमर शिवमणी, सतारवादक रवी चारी यांच्याशी संपर्क साधला असून, येत्या काही दिवसांत कलाकारांची नावे निश्चित होणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर औरंगाबाद महापालिकेत मेगा भरती; 178 पदे भरणार