Haribhau Bagade: राज्यात नुकत्याच सात हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना गावकऱ्यांनी निवडून दिले आहे. त्यामुळे आता नवनिर्वाचित सरपंच कामाला लागले आहे. मात्र याचवेळी भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या नवनिर्वाचित सरपंचांना मोलाचा सल्ला दिला आहे. 'लग्नाची पत्रिका असो नसो, लोकांच्या लग्नाला जा' असा सल्ला बागडे यांनी निवडून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांना दिला आहे. 


गेल्या आठवड्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येणाऱ्या भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपकडून औरंगाबादच्या संत एकनाथ रंग मंदिर नाट्यगृहात सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून हरिभाऊ बागडे यांना देखील बोलावण्यात आले होते. यावेळी बोलतांना बागडे यांनी आपला राजकीय अनुभव सांगतानाच वनिर्वाचित सरपंचांना काही महत्वाच्या गोष्टी समजून सांगितल्या. तर राजकीयदृष्ट्या काही मोलाचे सल्लेही दिले. 


बागडेंचा सल्ला... 


यावेळी निवडणून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांना सल्ला देतांना बागडे म्हणाले की, लग्नाची पत्रिका आहे की नाही याची चिंता न करता लोकांच्या लग्नाला जात जा, नवरीकडील लोकांना वाटेल नवरदेवाकडून पत्रिका असेल आणि नवरदेवाकडील लोकांना वाटेल नवरीकडील पत्रिका असेल.  त्यामुळे लग्नाला जा, अनेक लोकं तुम्हाला तिथे पाहतात. तसेच यावेळी पत्रावळ उचलू नका, पण नुसते वाका म्हणजे तुम्हाला वाकलेलं पाहून लोकं पत्रावळी उचलण्यासाठी येतील आणि लोकांना तुम्ही देखील वाकलेले दिसाल, असा सल्ला बागडे यांनी यावेळी दिला. तर त्यांच्या या हटके सल्ल्याची यावेळी जोरदार चर्चा पाहायला मिळाली.