Aurangabad Corona Update: चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक (Covid Outbreak)  पाहायला मिळत असल्याने, भारतात देखील केंद्र सरकारने कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी अलर्ट जारी केला आहे. तर याच पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) ग्रामीण आणि महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेत आता मनपाच्या सर्व 41 आरोग्य केंद्रांत (Health Center) कोरोना चाचणी (Corona Test) केली जाणार आहे. सोबतच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना देखील महापालिकेने आवश्यक सूचना दिल्या आहेत.


औरंगाबाद शहरात देखील कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. तर शहरात कोरोना चाचणी वाढवण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जाणार आहे. ज्यासाठी मनपाच्या सर्व 41 आरोग्य केंद्रामध्ये कोरोना चाचणी करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी दहा ते दुपारी 1 वाजेपर्यंत आरोग्य केंद्रात अॅण्टिजेन आणि आरटीपीसीआर ही कोरोना चाचणी करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचे लक्षण असलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सोबतच गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचे देखील आवाहन यावेळी करण्यात आले आहेत. 


ऑक्सिजन बेड तयार ठेवण्याचे आदेश...


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. तर खबरदारी म्हणून कोरोनाचा सामना करण्यासाठी तयारी देखील करण्यात येत आहे. ज्यात मनपाच्या मेल्ट्रॉन, नेहरूनगर, आयओसी पदमपुरा, सिडको एन-8 आणि सिडको एन-19 या पाच आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचे 655 बेड उपलब्ध आहेत. तसेच ऑक्सिजन बेड तयार करून ठेवण्यात यावे आणि ऑक्सिजन टँकची तपासणी करण्याचा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.  तर रुग्णांना सर्व सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तयारी करून ठेवावी, असे पत्र या पाच केंद्रांना देण्यात आले आहे.


कोरोनाचा रुग्ण आढळला


वाळूज महानगरातील बजाजनगरात राहणाऱ्या एका 39 वर्षीय इसमाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याला सर्दी, पडसे अशी साधी लक्षणे असल्याने, त्याच्यावर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची सुरवातीला अॅण्टिजेन चाचणी करण्यात आली होती, ज्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, लवकरच अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. 


Aurangabad Corona Update: औरंगाबादमध्ये कोरोनाचा 'पहिला रुग्ण' आढळला, आरोग्य विभाग अलर्ट