Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आजपासून सुरुवात झाली आहे. आज 5 जानेवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून, 12 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार प्रत्यक्षात कामाला लागले आहेत. तर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून जवळपास संपूर्ण तयारी करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेवर प्रत्येक तालुक्यात 1 याप्रमाणे 76 भरारी पथकांची नजर असणार आहे.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रत्येक भरारी पथकात तीन ते चार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. हे पथक आचारसंहितेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवतील. भरारी पथकांसह क्षेत्रीय पथक, व्हिडीओग्राफी पथक, अन्य दोन, अशी चार पथके असतील. प्रत्येक तालुक्यात 15 ते 16 विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेपर्यंत जवळपास 1200 कर्मचारी असणार आहे. ज्यात 61529 मतदारांसाठी विभागात मूळ 222 आणि सहायक 5, अशी एकूण 227 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम
- निवडणुकीची अधिसूचना 5 जानेवारीला जाहीर होणार.
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटीची तारीख 12 जानेवारी असणार.
- नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याची तारीख 13 जानेवारी असणार.
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी असणार.
- मतदान प्रक्रिया 30 जानेवारीला पार पडणार आहे.
- मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे.
जिल्हानिहाय मतदार आणि केंद्रसंख्या
जिल्हा | मतदार संख्या | केंद्रसंख्या |
औरंगाबाद | 13924 | 53 |
जालना | 5037 | 15 |
परभणी | 4472 | 18 |
हिंगोली | 3060 | 12 |
नांदेड | 8821 | 30 |
बीड | 9769 | 34 |
लातूर | 11264 | 40 |
उस्मानाबाद | 5182 | 25 |
असा रंगणार सामना...
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार विक्रम काळे मैदानात असणार आहे. तर काळे यांच्या विरोधात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले किरण पाटील जाधव रिंगणात असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. सद्या दोन्ही पक्षाकडून अधिकृत अशी घोषणा करण्यात आली नसली तरीही उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करतांना दोन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केला जाण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आचारसंहिता लागू! शिक्षक मतदारसंघासाठी 30 जानेवारीला मतदान