Chandrakant Khaire On Radheshyam Mopalwar: राज्यात सद्या खोक्यांची चर्चा सुरु असतानाच आता फ्रीजमधील खोक्यांची चर्चा सुरु झाली असून, यावरून शिंदे-ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर टीका करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान याच खोक्यांच्या चर्चेत आता वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधेश्याम मोपलवारांची नावची चर्चा होऊ लागली आहे. कोट्यवधी रुपये असलेले राधेश्याम मोपलवारांची ईडीकडून चौकशी करा अशी मागणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी असल्याचे देखील खैरे म्हणाले.
काय म्हणाले खैरे...
'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की, 'कुठे आहे तो राधेश्याम मोपलवार, करोडो, अब्जावधी रुपये त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच राधेश्याम मोपलवार यांच्या पाठीशी खुद्द एकनाथ शिंदे होते. शिंदे यांनी हे सर्व स्वतःसाठी केले की, इतर कुणासाठी केले मी सांगू शकत नाही. शिंदे माझे मित्र होते पण आता नाहीत. त्यामुळे तुम्ही आपसात भांडा आणि अधिकारी मजा करतील असे माझे त्यांना सांगणे आहे. तर राधेश्याम मोपलवार यांची चौकशी केली पाहिजे. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी किती पैसे कमवले हे त्यांना विचारलं पाहिजे. त्यांच्यामागे ईडी लावा त्यानंतर माहित पडेल काय आहेत ते, असेही खैरे म्हणाले.
फ्रीजमधील खोक्यावरून शिंदेंची ठाकरेंवर टीका...
बुलढाणा येथील शेतकरी मेळाव्यात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधतांना खोक्यांचा उल्लेख केला होता. त्यांच्या याच टीकेला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्रीजमधून गेलेले खोके कुठे गेले याचा मी शोध घेतो आणि मी तुमच्याशी बोलतो, असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांना दिला होता. तर कंटेनरमधून फ्रिजच्या खोक्यातून पैसे कुठे गेले, याचा शोध आता आम्ही घेणार, असंही शिंदे म्हणाले होते. त्यामुळे खोक्यांच्या चर्चेत आता फ्रीजमधील खोक्यांची चर्चा समोर आली आहे.
कोण आहेत राधेश्याम मोपलवार?
वादग्रस्त सनदी अधिकारी म्हणून राधेश्याम मोपलवार यांची ओळख आहे. तर समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात सुरुवातीपासूनच मोपलवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. फडणवीसांच्या काळात सेवानिवृत्तीनंतर त्यांना अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान सतीश मांगले या व्यक्तीने मोपलवार यांनी एक कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यासंदर्भातील एक ऑडीओ क्लिप देखील समोर आली होती. याचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले होते. ज्यामुळे एक दिवसाचे कामकाज वाया गेले होते. पुढे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र पुन्हा काही काळाने ते सेवेत परतले. त्यातच आता त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात पायाभूत सुविधा सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी अनेक गंभीर आरोप केले होते.