Aurangabad News: ग्रामीण भागात दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला व्यापाऱ्यांकडून प्रारंभ करण्यात येतो. त्यामुळे यावेळी नेमकं काय भाव जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. मात्र यावेळी दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा परिसरात कापसाची मोठी बाजारपेठ असून, दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला व्यापाऱ्यांकडून प्रारंभ करण्यात आला. यावेळी कापसाला 11 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला आहे. व्यापारी संतोष फरकाडे व दत्ता काकडे यांनी विजया दशमीच्या मुहूर्तावर 11 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
पैठण तालुक्यात साडेसात हजारांचा भाव..
सिल्लोड प्रमाणेच पैठण तालुक्यातील टाकळी अंबड व परिसरात विविध ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर टाकळी अंबड येथे बुधवारी सकाळी वजन काट्याचे विधिवत पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर विक्रीसाठी आलेल्या कापसाला साधारणतः 7 हजार 700 ते 8 हजार दरम्यान प्रति क्विंटल भाव देण्यात आला. सुजल कृषी उद्योग वतीने पहिल्याच दिवशी 10 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. विशेष म्हणजे मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात या भागात 10 हजाराहून अधिक भाव कपाशीला मिळाला होता.
आवक घटणार...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. मात्र यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी तुंबल्याने पिकांची वाढ खुटली आहे. तर काही ठिकाणी पिकं पिवळी पडली असल्याचे चित्र होते. त्यामुळे यंदा कापसाची आवक घटण्याची शक्यता आहे. आवक जर घटली तर निश्चीतच कापसाला भाव चांगला मिळू शकतो. मात्र भाव मिळाला तरी पिक घटल्याने शेवटी शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे.
ओल्या कापसाला भाव कमीच...
यावर्षी मराठवाड्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. तर कापूस वेचणीला आला असताना देखील पावसाची रिपरिप अनेक भागात सुरूच आहे. त्यामुळे कापूस पुर्णपणे ओलसर झाला आहे. विशेष म्हणजे प्रतवारी पाहून कापसाला भाव देण्यात येतो. कापूस ओला असल्यास त्याचे वजन जास्त भरतो, मात्र भाव कमी मिळतो. प्रथमिक माहितीनुसार पहिल्या वेचणीतील कापूस वजन करत असून, ओलाही आहे.
महत्वाच्या बातम्या...
Dhiraj Deshmukh : सरकार शेतकऱ्यांना 'गोगलगायी'च्या गतीनेच मदत देणार का? आमदार धिरज देशमुखांचा सवाल