Aurangabad News: एकीकडे राज्यात टीईटी घोटाळ्याचे प्रकरण गाजत असतांना दुसरीकडे आता औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या निकालावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. दुसऱ्या सत्राच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयात चक्क शून्य गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे याच विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात त्याच विषयात 'ए ग्रेड' मिळाले असतांना आश्चर्य व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या निकालात गोंधळ झाला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. 


काय आहे प्रकरण...


6 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या बीएय, बीकॉम, बीएससीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र यावेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक विद्यार्थी यांचे ग्रेड शून्य दाखवण्यात आले. काहींना एका विषयात तर काहींना चार-चार विषयात शून्यू ग्रेड दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच विद्यार्थ्यांना त्याच विषयात पहिल्या सत्रात ए ग्रेड मिळाले आहे. त्यामुळे मुलांना शून्य मार्क देण्यात आल्याने आमच्या मुलांनी पेपर लिहलाच नाही का? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. 


यांना मिळाली शून्य गुण...


जालना जिल्ह्यातील बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात असलेल्या एका विद्यार्थ्याला सर्व विषयात ए प्लस आणि ए ग्रेड मिळाले आहे. मात्र एकट्या इंग्रजी विषयात त्याला शून्य ग्रेड दाखवण्यात आले आहे. अशाच दुसऱ्या एका विद्यार्थ्याला बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात सर्व विषयात ए प्लस आणि ए ग्रेड मिळाले असून, व्यवसाय गणित आणि सांख्यिकी या विषयात शून्य ग्रेड दाखवण्यात आले आहे. अशा पद्धतीने मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वेगवेगळ्या विषयात शून्य ग्रेड दाखवण्यात आल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे याची तात्काळ दखल घेऊन विद्यापीठाने खुलासा करावा अशी मागणी केली पालकांनी केली आहे. 


कुलगुरू म्हणतात निकालात सुधारणा होऊ शकते...


यावर बोलतांना मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले म्हणाले की, यात आक्षेपाचा प्रश्न नसतो. त्या निकालात बदल होऊ शकतो. पाच-दहा टक्के निकालच असं होऊ शकते. त्यामुळे ज्यांना शून्य ग्रेड मिळाली आहे, त्यांनी परीक्षा भवनला जाऊन भेटावे त्यात सुधारणा करून दिले जाईल, असे कुलगुरू म्हणाले आहे. 


विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना भुर्दंड का?


ज्यांच्या गुणपत्रिकांवर चुका झाल्या आहेत, त्यांनी विद्यापीठातील परीक्षा भवनात अर्ज करून दुरूस्ती करून घेण्याचे आवाहन कुलगुरू यांनी केले आहे. मात्र इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात परीक्षा भवनला येणे शक्य नाही. तसेच विद्यापीठाच्या चुकीसाठी विद्यार्थ्यांना प्रवासाचा भुर्दंड का? असाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे प्रत्येक महविद्यालयाकडून विद्यापीठाने अशा शून्य ग्रेड मिळालेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागवून घ्यावी. तसेच विद्यापीठाने त्यांच्या पातळीवर दुरुस्ती करून नवीन गुणपत्रिका संबधित महाविद्यालयात पाठवावेत अशी मागणी पालकांनी केली. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI