Aurangabad News: मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातील आपल्या दालनात प्रवेश केला. तसेच लगेचच विविध विषयांवरील बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अपेक्स ॲथॉरिटीच्या पहिल्या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. यावेळी औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन येथील ऑरिक सिटीच्या दृष्टीने बिडकिन ते पैठण मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गतीने व्हावे, अशी मागणी शिंदे यांनी केली. याबाबत त्यांनी ट्वीट कर माहिती दिली आहे. 




केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही मुद्दे उपस्थित केले. ज्यात बंगलोर- मुंबई कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही. मात्र आता कोरेगाव सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येईल व जमीन संपादन सुरू करण्यात येईल,असे मुख्यमंत्री म्हणाले. सोबतच वाराणसी- मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम व्हावे यादृष्टीने मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला शिंदे यांनी अनुमोदन केले. हे काम झाल्यास या कॉरिडॉरमधील परिसराचा विकास होईल,असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


तर राज्यातील टेक्सटाइल पार्क, मेडिकल पार्क आणि बल्क ड्रग पार्क यांना केंद्र शासनाने लवकरात लवकर मान्यता दिल्यास या पार्क्सचे काम जलद गतीने सुरू होऊन राज्याला आणि पर्यायाने केंद्रालाही मोठा फायदा होईल,असाही मुद्दा शिंदे यांनी मांडला. सोबतच औरंगाबाद येथील शेंद्रा बिडकीन येथील ऑरिक सिटीला उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी 5 हजार 542 कोटींची गुंतवणूक आली असून 375 एकर भूखंड उद्योगांना देण्यात आले आहेत. याठिकाणी 3 लाख लोकांना रोजगार मिळेल.त्यामुळे पंतप्रधानांनी देखील या प्रकल्पाचे कौतुक केले असल्याच मुख्यमंत्री म्हणाले. सोबतच औरंगाबाद-बिडकिन ते पैठण मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गतीने व्हावे, असेही मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.