Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर असणार असून, त्यांचा अधिकृत दौरा आला आहे. तसेच राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा देखील औरंगाबादच्या पैठण तालुक्यात होणार असल्याची माहिती भुमरे यांनी दिली आहे. 


असा असणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा...



  • दुपारी 12 वाजता मुंबई येथून शासकीय विमानाने चिकलठाणा औरंगाबाद विमानतळाकडे रवाना होणार.

  • दुपारी 12.30 वाजता चिकलठाणा औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने पैठणकडे रवाना होतील.

  • दुपारी 01.40 वाजता पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिरास भेट व नाथ महाराजांचे दर्शन

  • दुपारी 01.55 पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील.

  • दुपारी 02.00 वाजता शिवसेना पक्षाच्या जाहीर सभेस उपस्थिती लावणार. (स्थळ- कावसानकर स्टेडियम, पैठण)

  • दुपारी 03.30 वाजता पैठण येथून मोटारीने आपेगांव (ता. पैठणकडे)  रवाना होतील.

  • दुपारी 03.45 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट व दर्शन (स्थळ- आपेगांव ता. पैठण)

  • सायंकाळी 04.15 वाजता आपेगांव (ता. पैठण) येथून मोटारीने पाचोडकडे रवाना होतील.

  • सायंकाळी 04.45वाजता रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. (स्थळ- पाचोड ता. पैठण)

  • सायंकाळी 05.15 वाजता पाचोड (ता. पैठण) येथून मोटारीने आडूळ मार्गे चिकलठाणा विमानतळकडे रवाना होतील.

  • सायंकाळी 06.00 वाजता चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.


सभेची जोरदार तयारी सुरु...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तास्थापनेनंतर दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाने केलेल्या बंडात सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील होते. त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्वाचा समजला जात आहे. तर पैठणच्या कावसानकर स्टेडियमवर मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. तर या सभेसाठी आठवड्याभरापासून तयारी करण्यात येत आहेत. त्यामुळे आता या सभेत शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.