Sanjay Shirsat On Chandrakant Khaire: निवडणूक आयोगाने शिवसनेचा धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena Symbol) गोठवण्याचा निकाल दिल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर ग्रामपंचायत निवडणूकबाबत गंभीर आरोप केले आहेत. खैरे हे प्रत्येक महिलांना रात्री बारा-एक वाजता फोन करायचे आणि बघा आम्हाला मतदान केले नाही तर काय होईल असे सांगायचे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. 


एबीपी माझाला प्रतिक्रिया देतांना शिरसाट म्हणाले की, चंद्रकांत खैरे आजकाल थोडे पागल झाले आहेत. त्यांना सुद्धा वाटायला लागले आहे की, रोज सकाळी उठल्यावर आपली सुद्धा कोणीतरी बाईट घेतली पाहिजे. तसेच बाईट देतांना असे काही विधान करायला पाहिजे की सगळीकडे आपली चर्चा व्हायला पाहिजे. त्यामुळे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास काम करत असल्याने याचे दुःख त्यांना वाटत आहे. शिंदे यांचा असाच वेग असल्यास आपलं काय होईल अशी चिंता त्यांना लागली आहे. सत्तांतरानंतर औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक मी जिंकून दाखवली. यावेळी खैरे काय करायचे तर, प्रत्येक महिलांना रात्री बारा-एक वाजता फोन करायचे आणि बघा आम्हाला मतदान केले नाही तर काय होईल असे सांगायचे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. 


खैरेंना आता मातोश्रीवर कोणी विचारत नाही...


खैरे यांच्यावर टीका करतांना शिरसाट पुढे म्हणाले की, खैरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपलं वजन  वाढवायचं आहे. आम्ही दोघांनी सोबत मराठवाड्यात शिवसेना आणली आहे. आज त्यांना मातोश्रीवर कोणी विचारत नसून, त्यांचे हेच अवघड दुखणं आहे. त्यामुळे त्यांनी आज बडबड केली नाहीतर तर ते कचऱ्याच्या डब्यात जातील. खैरे यांचे विरोधक असलेले अंबादास दानवे तर विरोधी पक्षनेते झाले. पण खैरे यांचे पुनर्वसन कसे होणार. म्हणून काहीतरी विधान करून प्रसिद्धीत राहण्याचा खैरे यांचा प्रयत्न सुरु असतो, असे शिरसाट म्हणाले. 


चिन्हांबाबत आज बैठक होणार...


शिंदे गटाचे नाव आणि चिन्ह काय असणार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. तसेच आज संध्याकाळी 7 वाजता आपल्या गटाचे सर्वच खासदार, आमदार आणि नेत्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत याबाबत चर्चा होणार असून, त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत,असे शिरसाट म्हणाले. 


शिंदे गटाने पोटनिवडणुकीत उतरले पाहिजे...


अंधेरी विधानसभा निवडणूकबाबत बोलतांना शिरसाट म्हणाले की, आज होणाऱ्या बैठकीत अंधेरी विधानसभेची पोटनिवडणुक लढवण्याबाबत सुद्धा चर्चा होणार आहे. शिंदे गटाने ही निवडणूक लढवावी की नाही याबाबत चर्चा होणार आहे. माझे तर हे वैयक्तिक मत असे आहे की, शिंदे गटाने निवडणूक लढवली पाहिजे. युतीत पुढे काही होईल, पण आपला उमेदवार रिंगणात उतरवला पाहिजे असे माझं मत असल्याच शिरसाट म्हणाले.