Aurangabad News: मराठवाड्याची रेल्वे गतीमान करण्यासाठी गेली काही वर्षांपासून औरंगाबादमध्ये पीटलाइनची मागणी होत असतानाच आता या मागणीला यश आले आहे. तर आज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw) यांचे हस्ते पिटलाईनचे भुमिपुजन करण्यात आले आहे. औरंगाबाद व जालना येथिल पिटलाइनचे भुमिपुजन यावेळी करण्यात आले. 2 जानेवारीला जालना रेल्वे स्टेशनवर 100 कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) यांनी केली होती. त्यानंतर अखेर मे महिन्यात औरंगाबादेत 16 बोगींच्या पीटलाइनसाठीही 29 कोटी 94 लाख 26 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. अखेर आज या कामाचे भूमिपूजन झाले आहे. यावेळी भूमिपूजन सोहळ्यात रेल्वेमंत्री वैष्णव यांच्यासह रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली.
मागील अनेक दशकांपासून मराठवाड्यातील रेल्वेची कामे अपेक्षित होती. तर गेल्या 10 वर्षांपासून औरंगाबादकरांकडून पीटलाइनची मागणी केली जात होती. मात्र आता प्रत्यक्षात औरंगाबाद येथील पीटलाइनच्या कामाला सुरवात झाली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने औरंगाबाद आणि जालना पीटलाइनला मंजुरी मिळाली आहे. तर आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास दोन्ही पीटलाइनचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. यावेळी जालना रेल्वे स्टेशन आणि औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या नुतनीकरणाचे प्रेझंटेशन देखिल दाखवण्यात आले. तर पिटलाइनमुळे मराठवाड्यातील रेल्वे गतिमान होणार असून, यामुळे 35 हजार किलोमीटरचे अंतर पार करून आलेल्या रेल्वेगाड्यांची क्लिनिंग आणि वॉशिंग जालन्यात तसेच औरंगाबाद येथे होणार आहे.
पिटलाइनमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार
जालना- मनमाड, सिकंदराबादहून निघालेल्या रेल्वे गाड्यांना 663 किलोमीटर अंतर कापण्यासाठी तेरा तास लागतात. चोविस तासांत जालना स्थानकातून अनेक रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या होतात. या अंतरामध्ये रेल्वेची स्वच्छता, दुरुस्तीसह किरकोळ कामे होण्याची गरज असते. अंतराच्या अनुषंगाने जालना रेल्वेस्थानक आणि औरंगाबाद हे प्रायमरी मेंटेनन्स पिटलाइन केंद्रासाठी सोयीस्कर ठरणार आहे. या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने जालन्याचा तसेच औरंगाबादचा सर्व्हे केला होता. विशेष म्हणजे या दोन्ही पिटलाइनमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे. सोबतच औरंगाबाद आणि जालन्याची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या...