Aurangabad News: औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टराला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे दोन वाजता समोर आली आहे. त्यांनतर कारवाईच्या मागणीसाठी डॉक्टरांकडून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत डॉक्टर जखमी झाले आहे. डॉ. उदय चेंदूर मारहाण झालेल्या डॉक्टरांच नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 17 मध्ये डॉ. उदय चेंदूर रात्रीच्या शिफ्टमध्ये कर्तव्य बजावत होते. यावेळी रात्री दोन वाजेच्या सुमारास अपघात जखमी झालेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांनी आमच्या रुग्णाला चांगला उपचार मिळत नसल्याचे सांगत राडा घालायला सुरवात केली. यावेळी डॉ. उदय चेंदूर यांच्याकडून त्यांची समज काढण्याचा प्रयत्न केला जात असतानाच त्यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. या मारहाणीत चेंदूर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. 


डॉक्टरांचा आरोप...


या घटनेवर प्रतिक्रिया देतांना निवासी डॉक्टर म्हणाले की, चेंदूर यांना मारहाण करणाऱ्या तरुणाचा मोठा भाऊ रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आला होता. मात्र मारहाण करणारा तरूण दारू पिऊन वार्डमध्ये आला आणि त्याने राडा घालत डॉक्टरांना धक्काबुक्की करत मारहाण केली. गेल्या आठवड्यात सुद्धा अशीच घटना समोर आली होती. त्यामुळे आम्ही काम कसे करावे असा प्रश्न निवासी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. 


निवासी डॉक्टर संपावर...


औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाईच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी काम बंदची घोषणा केली असून, संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक पाऊल उचलण्याची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही, तोपर्यंत कामावर हजर राहणार नसल्याचं निर्णय निवासी डॉक्टरांनी केला आहे. 


घाटी प्रशासनाची महत्वाची बैठक...


निवासी डॉक्टरांच्या संपाच्या भुमिकेनंतर घाटी प्रशासनाने एक महत्वाची बैठक बोलावली आहे. डॉक्टरांना झालेल्या मारहाणीची घटना आणि काम बंदच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली आहे. त्यांनतर कारवाईचे आश्वासन देत निवासी डॉक्टरांनी संप माघे घेण्याच्या सूचना घाटीचे डीन यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टर आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.