Aurangabad Bhondubaba : डोक्यावर हात ठेवून कॅन्सर आणि एड्ससारखे आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या बाबासाहेब शिंदे याचा एबीपी माझाने भांडाफोड करताच आता पोलिसांनी या बाबाची चौकशी सुरु केली आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या (Aurangabad Rural Police) पाचोड पोलिसांनी या बाबाला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा जवाब नोंदवून घेतला आहे. सोबतच आणखी काही लोकांचे जवाब घेतले आहे. त्यामुळे आता बाबाच्या विरोधात प्रशासनाने भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्यावर हात फिरवून आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या बाबासाहेब शिंदे याला पाचोड पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याचा सविस्तर जवाब नोंदवून घेण्यात आला आहे. सोबतच आणखी आठ म्हणजेच आतापर्यंत एकूण 9 लोकांचे जवाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहे. त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीनंतर आता प्रशासन सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाबासाहेब शिंदे या भोंदूबाबा विरोधात आता कारवाई होण्याची शक्यता आहे. 


वरिष्ठांना अहवाल सादर करणार...


पाचोड पोलिसांनी बाबासाहेब शिंदे याचा जवाब घेतला आहे. तसेच ज्या पारुंडी गावात शिंदे आरोग्य सभा भरवत होता त्याठिकाणी जाऊन पोलिसांनी पाहणी केली आहे. तसेच गावातील काही लोकांचे सुद्धा जवाब घेण्यात आले असल्याचे समोर आले आहे. तर ज्यांच्या जागेवर ही सभा भरवली जात होती, त्या जागेच्या मालकाची सुद्धा चौकशी करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. तर बाबा आणि इतर लोकांचे जवाब घेऊन सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असून, तो वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.  


'अनिस'कडून गुन्हा दाखल करण्याची मागणी...


बाबासाहेब शिंदे याचा एबीपी माझाने भांडाफोड करताच त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरावरून होत आहे. तर बाबासाहेब शिंदे खोटी आश्वासन देऊन अंधश्रद्धा पसरवत असून, त्याच्यावर  अंधश्रद्धा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. डॉक्टर सुद्धा बरे करू शकत नाही अशा आजारांवर आपण उपचार करत असल्याचा दावा म्हणजे अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार असल्याचं अनिसचे राज्य सचिव शहाजी भोसले यांनी म्हंटले आहे.  


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: औरंगाबादच्या भोंदूबाबावर कारवाई करा; 'एबीपी माझा'च्या बातमीची सुप्रिया सुळेंकडून दखल


Aurangabad: डोक्यावर हात ठेवल्याने एड्स बरा, भोंदूबाबाच्या गावात पोहचलं प्रशासन; 'एबीपी माझा'ने दाखवली होती बातमी