Corona Update Aurangabad: राज्यासह देशातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. अशीच काही परिस्थिती आता औरंगाबाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता शंभरी पार गेली असून, शनिवारी सक्रीय रुग्णांचा आकडा 104 वर गेला आहे. तर पुन्हा 22 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे.
राज्यात आलेली तिसरी लाट ओसरल्यावर तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या शंभरी पार गेली आहे. शनिवारी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी 22 रुग्णांची वाढ झाली. ज्यात 17 रुग्ण शहरातील तर 5 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. तर 11 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सद्या 104 रुग्ण सक्रीय असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे. विशेष म्हणजे यातील 90 रुग्णांना कोणतेही गंभीर लक्षणे नाही.
घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक...
जिल्ह्यात आजघडीला 104 रुग्ण सक्रीय असून, यातील बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत आहे. ज्यात घाटी रुग्णालयात 4 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा सामन्या रुग्णालयात 2 रुग्ण, खासगी रुग्णालयात 6 रुग्ण, डीसीएचसीमध्ये 2 रुग्ण आणि घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 90 एवढी आहे.
लसीकरणाचा आकडा मंदावला...
तिसरी लाट ओसरल्यानंतर लसीकरणाच्या टक्केवारी सुद्धा मंदावली असल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 30 लाख 6 हजार 334 असून, दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचा आकडा 23 लाख 6 हजार 540 एवढा आहे. तर 90 हजार 359 लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
कोरोना लसीची मोफत 'घरपोच डिलिव्हरी'
प्रशासनाकडून कोणत्या घरातील किती लोकांनी लस घेतली आणि किती लोकांनी घेतली नाही याचा सर्वे करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांनी जर लसीकरण करून घेण्यासाठी होकार दिल्यास किंवा त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी काही अडचणी असतील तर त्यांना घरी जाऊन लस दिली जाणार आहे. सद्या रुग्ण संख्या कमी असली तरीही यात कधी वाढ होईल याचा अंदाज सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच त्यांनी सांगितल्यास त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्याची आमची तयारी असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांनी माध्यमांना दिली आहे.