corona update aurangabad: गेल्या काही दिवसांपासून राज्यसह देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा एकदा लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र लोकं लसीकरणासाठी पुढे येत नसल्याने प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. त्यामुळे औरंगाबादच्या आरोग्य विभागाने 'हर घर दस्तक' मोहीम हाती घेतली आहे. ज्यात नागरिकांनी लसीकरणासाठी फक्त हो म्हटले तरी आरोग्य विभाग घरी जाऊन लस टोचून देणार आहे.
अशी आहे योजना...
प्रशासनाकडून कोणत्या घरातील किती लोकांनी लस घेतली आणि किती लोकांनी घेतली नाही याचा सर्वे करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांनी जर लसीकरण करून घेण्यासाठी होकार दिल्यास किंवा त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी काही अडचणी असतील तर त्यांना घरी जाऊन लस दिली जाणार आहे. सद्या रुग्ण संख्या कमी असली तरीही यात कधी वाढ होईल याचा अंदाज सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच त्यांनी सांगितल्यास त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्याची आमची तयारी असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांनी माध्यमांना दिली आहे.
जिल्ह्यात रुग्ण वाढले...
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 22 नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे सक्रीय रुग्णांचा आकडा 83 वर जाऊन पोहचला आहे. तर शुक्रवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 होती. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत 30 लाख 5 हजार 134 नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, 23 लाख 4 हजार 449 जणांनी दोन डोस घेतले आहे. तसेच 88 हजार 28 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
काळजी घेण्याची गरज...
कोरोनाचा आकडा कमी झाल्याने राज्य सरकारने मास्क वापरण्याची सक्ती काढून घेतली आहे. मात्र आता पुन्हा रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टेंसिंग ठेवल पाहिजे आणि गरज असल्यास सैनिटाइजरचा वापर केला पाहिजे. नागरिकांनी काळजी घेतल्यास चौथी लाट रोखता येऊ शकते असे आवाहन सरकारकडून केले जात आहे.