Aurangabad News: आधीच कोरोनाच्या रुग्ण संख्या वाढत असतांना आता राज्यात अनेक ठिकाणी स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या (Swine Flu Causes) वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान याचवेळी औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहेत. कारण जिल्ह्यात स्वाइन फ्लूवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अवघ्या 5 दिवसांत दुपटीने वाढली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 23 ऑगस्टपर्यंत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 12 होती. आता ती संख्या 31 झाली आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अवघ्या 5 दिवसांत दुपटीने वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
आधी कोरोना आता स्वाइन फ्लू...
गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे. तर अजूनही कोरोनावर पूर्णपणे विजय मिळवता आला नसून, आजही रुग्ण आढळून येत आहे. त्यातच आता स्वाइन फ्लूमुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा आता रुग्ण वाढतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे स्वाइन फ्लूच्या संरक्षणासाठी शासनाद्वारे प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. तर अतिजोखमीच्या व्यक्तींना ही लस दिली जात आहे.
स्वाइन फ्लूबाबत अशी घ्या काळजी...
जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत पाच दिवसात दुपटीने वाढ झाल्याने डॉक्टरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ज्यात साबण आणि स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुणे. पौष्टिक आहार, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या अशा आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करावे. तसेच खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, घसादुखी, घशाला खवखव, ताप, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्या, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
कोरोनाचा दिलासा...
एकीकडे स्वाइन फ्लूने औरंगाबादकरांची चिंता वाढवली असतांना दुसरीकडे मात्र कोरोनाचा दिलासा मिळाला आहे. कारण सोमवारी औरंगाबाद शहरात दिवसभरात फक्त 2 रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे एकदिवस आधी 11 रुग्ण आदळून आले होते. त्यामुळे रुग्ण संख्या घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर सद्या जिल्ह्यात 46 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: धाब्यावर दारू पिण्यासाठी बसणं पडलं महागात, न्यायालयाने थेट सुनावली कारवासाची शिक्षा
Aurangabad : प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षकांचा मोर्चा; वैजापूर तहसील कार्यालयावर धडकले मोर्चेकरी