Abdul Sattar Called Departmental Meeting: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर आता खातेवाटप ही करण्यात आले आहे. तर कृषी मंत्रिपद औरंगाबादच्या अब्दुल सत्तारांकडे देण्यात आलं आहे. दरम्यान कृषी मंत्री पदाची जबाबदारी मिळताच अब्दुल सत्तारांनी तात्काळ मराठवाडा विभागाची बैठक बोलावली आहे. जुलै महिन्यात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा सत्तार घेणार आहे. जालना येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सकाळी साडेनऊ वाजता जालना येथे मराठवाडा विभागातील कृषी विभागाची आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी,विभागीय कृषी सह संचालक, कृषी आयुक्त, पुणे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांना जालना येथे उपस्थित राहता येणार नाही, त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याच्या सुध्दा सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यात मोठ्याप्रमाणात नुकसान...
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात तब्बल 4 लाख 43 हजार 70 हेक्टरवरील पिकांचे नुकसान आजवर झाले आहे.तर मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी अंदाजे 750 कोटी रुपये लागणार आहे. विभागीय प्रशासनाने 310 कोटींच्या नुकसानीचा अहवाल 31 जुलै रोजी शिंदे यांना सादर केला होता. त्यामुळे आता सत्तार यांच्या बैठकीत आणखी काही नवीन निर्णय घेतले जाणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.