Aurangabad NCP Protest: शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्र सरकारच्या विरोधात औरंगाबादमध्ये आज राष्ट्रवादीकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, वाढता भ्रष्टाचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि महिलांचा होणारा अपमान या प्रमुख मुद्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तर यावेळी औरंगाबाद शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. 


औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी जिल्हा कमिटीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर यावेळी 'या सरकारचे करायचं काय, खाली मुंडके वरती पाय','राज्यपालांची हकालपट्टी झालीच पाहिजे', असा घोषणाबाजी करण्यात आली. 


'पन्नास खोके एकदम ओके'चे टी-शर्ट


'पन्नास खोके एकदम ओके' ही घोषणा सध्या राज्यभरात गाजत आहे. पोळ्याला बैलाच्या अंगावरही अशाप्रकारे लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्त्यांच्या टी-शर्ट वर देखील ही घोषणा लिहिलेली पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये आज राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक 'पन्नास खोके एकदम ओके'  लिहलेले टी-शर्ट परिधान करून आले होते. त्यामुळे या आंदोलनात या  टी-शर्ट परिधान केलेल्या कार्यकर्त्यांची मोठी चर्चा पाहायला मिळाली. 


'या' आहेत प्रमुख मागण्या...



  • शेतकऱ्यांना पीक विमा मोबदला अपेक्षेप्रमाणे मिळत नाही, पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता स्वतःच्या कंपनीचां फायदा व्हावा यासाठी मोबदला देत नाही.

  • शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडणी थाबंवली पाहिजे, वीजबिल माफी झाली पाहिजे. तसेच वीजपुरवठा नियमितपणे झाला पाहिजे.

  • पशुधन असलेल्या जनावरांवरील 'लम्पी' या आजारावर लसीकरण झालेले नाही ते तात्काळ विनामुल्य झाले पाहिजे तसेच 'लम्पी' या आजारामुळे दगावलेल्या जनावरांचा मोबदला सर्व शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे.

  • सरकारमधील वाचाळवीर मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरले आहेत, त्याबद्दल त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे.

  • महाराष्ट्रात दररोज महिला, मुलींवर अत्याचाराच्या खुनाच्या घटना वाढल्या आहेत त्याचा बंदोबस्त केला पाहिजे.

  • बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना गुजरात सरकारने मुक्त केल्याबद्दल त्यांचा जाहिर निषेध महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे व आम्ही तो करीत आहे.

  • राज्यातील अनेक उद्योग गुजरात राज्यात जात असल्याचा मुद्दा.

  • युवक बेरोजगारीमुळे दररोज आत्महत्या करत असल्याच्या बातम्या रोज वर्तमानपत्रांमधे येत आहे. त्यामुळे या युवकांना त्वरीत नोकऱ्या उपलब्ध करुन द्याव्यात.

  • देशात वाढती महागाईमुळे जनता परेशान झाली असून, याचा जाहीर निषेध, धिक्कार आहे.

  • 2014 मधे काँग्रेस सरकार विरुद्ध 'बस हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार' म्हणणाऱ्या भाजप नेत्या स्मृती इराणी सध्या गायब आहेत, त्यांचा शोध घ्यावा व त्यांना विचारणा व्हावी अशी विनंती आहे.

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांचा हेतुपुरस्परपणे अपमान करतात, त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध व धिक्कार आहे.

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधे आल्यानंतर 4  महिन्यात ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण देणार होते. परंतु सदरील आरक्षण अद्याप मिळाले नाही, ते तात्काळ मिळाले पाहिजे.

  • शिंदे गट- ठाकरे गटाच्या वादामुळे राज्यातील सर्व निवडणुका मुद्दामपणे लांबणीवर टाकल्या आहेत. लोकशाही जिवंत राहण्यासाठी या निवडणुका तात्काळ घेण्यात याव्या अशी विनंती आहे.

  • स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे बाबा रामदेव यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.

  • महाराष्ट्रात वेगाने पसरणाऱ्या 'गोवर' आजारावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी.

  • महाराष्ट्र राज्यात सध्या पोलीस भरतीसाठी अर्ज करतांनी युवकांना प्रचंड त्रास होत आहे व गोंधळ सुरु आहे त्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी.