Aurangabad News: औरंगाबादच्या (Aurangabad) बीड बायपास (Beed Bypass Road) रोडवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी या बायपासचे रुंदीकरण व सर्व्हिस रोड बांधण्याची मागणी केली होती. मात्र सर्व्हिस रोडऐवजी प्रशासनाने बीड बायपासच्या तीन ठिकाणी उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. याचवेळी संपूर्ण उड्डाणपुलाचे काम होत आल्यावर, आता ठेकेदार आणि काम पाहणाऱ्या अभियंताला उड्डाण पुलाची उंची कमी झाल्याचं लक्षात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान ही चुकी सुधारण्यासाठी त्यांनी चक्क पुलाखाली सुमारे सात फूट खड्डा खोदला असल्याचाही आरोप होत आहे. 


औरंगाबादच्या बीड बायपासवरील गोदावरी हॉटेलजवळ बांधण्यात येत असलेला उड्डाणपूल पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शहरात किती वेगाने विकास काम सुरु आहे याचा भास होतो. पण या उड्डाणपूलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या कामानंतर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. 


मागणी सर्व्हिस रोडची, मान्यता मात्र उड्डाणपुलाची 


कारण औरंगाबादच्या बीड बायपास रोडवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सातारा आणि देवळाई परिसरातील नागरिकांनी बायपासचे रुंदीकरण व सर्व्हिस रोड बांधण्याची मागणी केली होती. अनेक आंदोलन आणि मोर्चे काढल्यावर कुठेतरी त्यांच्या मागणीला यश आले. पण सर्व्हिस रोडऐवजी प्रशासनाने बीड बायपासच्या तीन ठिकाणी उड्डाण पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. कामाला सुरवात देखील झाली. पण सरकारी काम आणि सहा महिने थांब अशापद्धतीने अखेर उड्डाणपूल उभा राहिला. पण खरी गमंत उड्डाणपूल उभा राहिल्यावर झाली. कारण संपूर्ण उड्डाणपुलाचे काम होत आल्यावर ठेकेदार आणि काम पाहणाऱ्या अभियंताला उड्डाण पुलाची उंची कमी झाल्याचं लक्षात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


पावसाळ्यात पाणी जमा होणार


आता विषय इथेच संपला नाही, तर आपली चूक लक्षात येताच ठेकदार आणि अभियंता यांनी  पुलाखाली सुमारे सात फूट खड्डा खोदला. त्यामुळे उड्डाणपूल पूर्णपणे खचला असून, पावसाळ्यात येथे पाणी जमा होणार आहे. धक्कादायक म्हणजे यासाठी बनवलेला रस्ता देखील पुन्हा उखडून फेकावे लागणार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 


तीन वर्षांच्या कालवधीनंतर देखील काम अपूर्णच...


मुळात अपघात कमी करण्यासाठी फक्त सर्व्हिस रोड करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. पण प्रशासनाने त्यापुढे जात एक दोन नवे तर तीन पुला बांधण्याचा निर्णय घेतला. आता हा निर्णय कुणासाठी घेतला असावा हा भाग वेगळा, पण तीन वर्षांच्या कालवधीनंतर देखील ना रस्ता झाला आहे ना उड्डाणपूलचे काम झाले आहे. पण शासकीय तिजोरीतील पैसा मात्र खर्च झाला असल्याचे आरोप होत आहे. 


Aurangabad News: आता ऐतिहासिक इमारतींची माहिती QR कोडमार्फत मिळणार, औरंगाबाद मनपा आयुक्तांचा निर्णय