Aurangabad Accident News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) सिडको चौकात एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. एका मद्यधुंद जीपचालकाने (स्कॉर्पिओ) भरधाव वेगात येत सिग्नलवर उभा असलेल्या तीन महागड्या कारला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (19 फेब्रुवारी) रोजी रात्री पावणे नऊ वाजेदरम्यान घडली. या अपघातात स्कॉर्पिओच्या धडकेत सिग्नलमध्ये थांबलेल्या एकासमोर एक अशा दोन कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यात एका फॉरच्यूनरचा देखील समावेश आहे. तर करण झीने (रा. पाचोड) असे या मद्यधुंद जीपचालकाचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सेव्हन हिलकडून सिडकोकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लेमन ट्री हॉटेलच्या बाजूने जळगाव रस्त्याकडे डाव्या बाजूने काही वाहने जात होती. दरम्यान, सिग्नल लाल झाल्याने सरळ जाणारी वाहने सिग्नलवर उभी होती. ज्यात कारचालक अबीर दांडेगावकर हा युवक (एमएच 26, एएफ- 582) सिग्नलवर आपल्या कारमध्ये बसला होता. त्यामागे उभी असलेल्या फॉर्म्युनर कारमध्ये मन्मित घई होत्या. सिग्नल लागल्याने त्यांनी हॅन्ड ब्रेक लावले होते. दरम्यान याचवेळी तब्बल 100 च्या वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने आधी फॉर्च्यूनरला जोराची धडक दिली. त्यामुळे फॉर्च्यूनर कार समोरील अबीर यांच्या कारवर आदळली. यात मन्मित या जखमी झाल्या. तर, अबीर यांच्या कारचा त्यांच्यासमोरील वॅगन आर या कारला धक्का लागल्याने तिचे देखील नुकसान झाले. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला होता. 


मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाला कोंडून ठेवले...


मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने वेगात येऊन सिग्नलवर उभा असलेल्या गाड्यांना जोराची धडक दिल्याने एकच गोंधळ उडाला होता. तर पाहता-पाहता घटनास्थळी मोठा जमाव जमला. तर मद्यधुंद चालक करण झीने यास चोप देण्यासाठी जमाव एकवटत होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे कळताच सिग्नलवर कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विवेक चव्हाण यांनी करण झीनेला धरुन कर्मचाऱ्यांना बसवयाच्या पोलिस बूथमध्ये कोंडून ठेवले. तसेच याची माहिती तत्काळ 112 वर कळवली.  


गर्दी अन् गोंधळ... 


रविवारी शिवजयंती असल्याने क्रांती चौकाकडे जाणाऱ्या आणि तिथून परत येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या रस्त्यावर पाहायला मिळत होती. त्यामुळे सिडको चौकात झालेल्या या अपघातानंतर मोठी गर्दी जमा झाली होती. तसेच तीन गाड्यांना झालेल्या तिहेरी अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाच्या विरोधात नागरीक आक्रमक होत असल्याने गोंधळ उडाला होता. मात्र वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळल्याने मोठा अनर्थ टळला. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Aurangabad: अखेर औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील रंजना, प्रतिथा वाघिणी गुजरातला रवाना