Gram Panchayat Election: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) एकूण 216 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यामुळे यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणुका विभागाकडून (Election Department) जोरदार तयारी करण्यात येत. सोबतच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) 6 डिसेंबर व 12 डिसेंबर 22 रोजी, मतदान अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. मात्र या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती तहसिलदार ज्योती पवार यांनी दिली आहे.
पवार यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर निवडणूकीसाठी 6 डिसेंबर व 12 डिसेंबर 22 रोजी, मतदान अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. तथापि बरेच कर्मचारी हे वॉरंट देऊनही सदर प्रशिक्षणास गैरहजर राहिले आहे. गैरहजर राहीलेल्या कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. सदर कर्मचारी जर निवडणूक कामावर हजर झाले नाही तर त्यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 23 नुसार कारवाई करण्यात येईल. त्यामुळे गैरहजर असलेल्या कर्मचारी यांनी 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तहसिल कार्यालय, औरंगाबाद येथे प्रशिक्षणास हजर राहावे. नसता त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करावा, असे निर्देश तहसिलदार ज्योती पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
216 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी
औरंगाबाद जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 216 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली असून, प्रचाराचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात थेट सरपंचपदासाठी 1092, तर सदस्यपदासाठी 5481 अशा 6573 उमेदवारांनी अर्ज दाखल झाली होती. त्यांपैकी 371 जणांचे अर्ज छाननीत बाद झाले, तर 1900 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी 611 तर सदस्यासाठी 3626 असे 4237 उमेदवार शिल्लक आहेत. विशेष म्हणजे यातील थेट सरपंचपदी 14 तर सदस्यपदी 308 उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीची आकडेवारी
तालुका | सरपंच पदाचे उमेदवार | सदस्य पदाचे उमेदवार | बिनविरोध सरपंच | बिनविरोध सदस्य |
औरंगाबाद | 100 | 577 | 02 | 61 |
पैठण | 60 | 472 | 00 | 09 |
फुलंब्री | 49 | 321 | 03 | 21 |
सिल्लोड | 54 | 352 | 00 | 15 |
सोयगाव | 11 | 26 | 01 | 26 |
कन्नड | 140 | 833 | 03 | 63 |
खुलताबाद | 29 | 200 | 01 | 12 |
वैजापूर | 79 | 382 | 01 | 46 |
गंगापूर | 89 | 463 | 03 | 55 |
एकूण | 611 | 3626 | 14 | 308 |