Aurangabad News:  औरंगाबाद महसूल विभागाने जोरदार कारवाई करत, समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीला 14 कोटींचा दंड ठोठावला आहे. एका खासगी जमिनीतून कंपनीने सुमारे 81 हजार घन मीटर मुरूम मुरूम अवैधपणे उत्खनन करून वापरला असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यांनतर चौकशीअंती महसूल विभागाने हा दंड भरण्याचे आदेश काढले आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर दंड ठोठावल्याने याची परिसरात जोरदार चर्चा आहे. 


काय आहे प्रकरण...


गेल्या काही वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागातून जात आहे. दरम्यान वैजापूर तालुक्यातील काम एलअँडटी या कंपनीने घेतलेले आहे. रस्त्याची उंची वाढवण्याच्या कामासाठी कंपनीने परिसरातील मुरूम- माती मोठ्या प्रमाणावर उपसा केलेली आहे. यात कंपनीने लाखो ब्रास मुरूम विनापरवानगी उत्खनन करून वापरला असल्याचा आरोप आहे. अशाच एका प्रकरणात विपीन बबनराव साळे यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे एक तक्रार दाखल केली होती. ज्यात वैजापूरच्या अमानतपूरवाडी येथील एका खासगी जमिनीतून एल अँड टी कंपनीने सुमारे 81 हजार घन मीटर मुरूम अवैधपणे उत्खनन करून रस्त्याच्या कामासाठी वापरला असल्याचं म्हंटले गेले होते. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांनी वैजापूर तहसीलदरांना संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 


तहसीलदारांकडून 14 कोटींचा दंड...


जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार वैजापूर तहसीलदार आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी चौकशी केली. तसेच पंचनाम्याच्या आधारे वैजापूर तहसीलदार राहुल गायकवाड यांनी एल अँड टी कंपनीने 23 हजार498 ब्रास मुरूम अवैधपणे उत्खनन केल्याचा निकष काढला. त्यानुसार 1200 प्रति ब्रास याप्रमाणे रुपये 2 कोटी 81 लाख 97 हजार 600 इतक्या बाजार मूल्याची आणि पाच पट दंडाची रक्कम अशी एकूण 14 कोटी 9 लाख 88 हजार इतका दंड भरण्याचा आदेश दिला आहे.


महत्वाची बातमी...


Jayakwadi: जायकवाडीचा पाणीसाठा 62 टक्क्यांवर; सलग चौथ्यावर्षे धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता


Marathwada: मराठवाड्यातील 172 मंडळात अतिवृष्टी; 52 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान