Imtiyaz Jaleel On Subhash Desai: गेल्या काही दिवसांपासून नागपूर येथील अधिवेशनात विरोधकांकडून भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. मात्र अशातच आता विरोधी पक्षातील ठाकरे गटातील माजी मंत्र्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी गंभीर आरोप केले आहे. महाविकास आघाडीतील तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी एमआयडीसी जमीन विक्रीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा दावा जलील यांनी केला आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला आहे. 


यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग येणे बंद झाले आहेत. तर गेल्या काही काळात औरंगाबादमध्ये एमआयडीसीच्या जागा विक्रीचा गोरखधंदा सुरु आहे. तर महाविकास आघाडीत उद्योग मंत्री राहिलेले आणि औरंगाबाद जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या कार्यकाळात कोणतेही उद्योग आणले नाहीत. मात्र उद्योगासाठी असलेल्या एमआयडीसीच्या जागा मात्र त्यांनी विक्री केल्या असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.  इंडस्ट्रियल प्लॉटचा वापर उद्देशचा बदल करून हजारो कोटींचा घोटाळा देसाई यांनी केला. बिल्डरांकडून  कोट्यावधी रुपये घेऊन प्लॉट नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले असल्याचा आरोप देखील जलील यांनी केला आहे. 


देसाईंचा मुलगा ठरवत होता दर... 


खासदार जलील यांनी सुभाष देसाई यांच्यासह त्यांच्या मुलावर देखील गंभीर आरोप केले आहे. या सर्व प्रकरणात देसाई यांचा मुलाचा सहभाग होता. देसाई यांचा मुलगा संबधित बिल्डरांशी संपर्क करून रेट ठरवित होता. तर हा सर्व घोटाळा तब्बल एक हजार कोटीच्या घरात असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. 


तर अनेक मंत्री जेलमध्ये जातील... 


पुढे बोलतांना जलील म्हणाले की, औरंगाबादेतील 32 हजार हेक्टर जमिनीचा वापराचा हेतू बदलण्यात आला आहे. तर 52 उद्योगांच्या जमिनीचे व्यावसायिक आणि रहिवाशी असा हेतू बदलण्यात आला आहे. केवळ सुभाष देसाईच नाही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अशाच प्रकारे हेतू बदलला असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापना करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. तसेच या सर्व प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी झाल्यास अनेक अधिकारी आणि मंत्री जेलमध्ये जातील असा दावाही जलील यांनी केला आहे.