Aurangabad News: प्लास्टिक आणि कचऱ्याचा योग्य पुनर्वापर केल्यास प्रदूषण नियंत्रण ठेवता येईल असे अनेकदा अभ्यासकांकडून सांगितले जाते. याचाच प्रत्यय औरंगाबादमध्ये आला असून, दोन तरुणींनी 16 हजार बॉटल्स व 12 ते 13 टन प्लास्टिक कचरा गोळा करून त्यापासून इकॉब्रिक्स तयार करत झोपड्या बनवल्या आहेत. यासाठी त्यांनी चार महिने शहरातील रस्त्यांवर पडलेल्या प्लास्टिक बॉटल्स जमा केल्या.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मास्टर ऑफ फाईन आर्टस् चे शिक्षण घेत असलेल्या कल्याणी भारंबे आणि नमिता कपाळे यांनी लॉकडाऊनच्या काळात औरंगाबाद शहरातील रस्त्यावरील रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स व प्लास्टिक रॅपर (non-biodegradable) जमा करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण चार महिन्यात त्यांनी शहरातील रस्त्यांवरून त्यांनी 16 हजार बॉटल्स व 13 टन प्लास्टिक कचरा गोळा केला. त्यांनतर 7 ट्रॅक्टर माती, भुसा आणि जमा केलेल्या 16 हजार प्लास्टिक बॉटल्सपासून 7 झोपड्या बनवण्यात आल्या आहेत. शहरापासून जवळ असलेल्या दौलताबाद-शरणापूर फाटा रोडवर ह्या झोपड्या तयार करण्यात आल्या असून, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिननिमित्त सर्वांना बघण्यासाठी खुले करण्यात आल्या होत्या.


असा केला प्रयोग...


रिकाम्या बॉटल्समध्ये कचरा भरून हवाबंद केले. त्यासाठी हजारो बॉटल्स जमा करून भिंतीची उभारणी केली. या 20 बाय 20, 10 बाय 10 आणि 11 बाय 15 अशाप्रकारे तीन फुटांच्या भिंती उभारल्या. एवढेच नव्हे तर 19 बाय 19, 34 बाय 9.5 फुटांपर्यंत भिंती उभारून झोपड्या तयार करण्यात यश मिळवले. त्यांनी तिन्ही ऋतुंमध्ये या घरांची चाचणी घेतली आहे.


यु-ट्यूबवरून सुचली कल्पना...


लॉकडाऊनकाळात यूट्यूबवर आरो व्हिलेज सिटीचे पेज कल्याणी भारंबे आणि नमिता कपाळे यांच्या पाहण्यात आले. ज्यात टाकाऊ बॉटल्स आणि कचरा घेऊन त्यापासून बॉटल्स ब्रिक्स तयार केली जात असल्याचे त्यांनी पाहिले. हे पाहून शहरात असा प्रयोग करता येऊ शकेल, अशी कल्पना त्यांना सुचली. त्यानंतर त्यांनी गुगलवर माहिती संकलित करून 3 महिने संशोधन केले. त्यानंतर चार महिन्यांत विविध भागांतून 16 हजार बॉटल्स व कचरा जमा केला आणि त्यापासून इकॉब्रिक्स तयार करत झोपड्या बनवण्याचा प्रयोग यशस्वी केला.