Aurangabad Crime News: मराठवाड्यासह औरंगाबाद (Aurangabad) शहराला हादरवून टाकणाऱ्या संकेत कुलकर्णी खून खटल्याची अंतिम सुनावणी मंगळवार आणि बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे.  23  मार्च 2018 रोजी कामगार चौकाजवळ भररस्त्यात संकेत कुलकर्णी नावाच्या तरुणाच्या अंगावर पाच ते सहा वेळा कार घालून कारखाली चिरडून त्याची हत्या करण्यात आली होती. दरम्यान चार वर्षांनी यावर न्यायालयाकडून अंतिम सुनावणी होत आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील मूळ रहिवासी असलेला संकेत कुलकर्णी औरंगाबादेत बारावीचं शिक्षण घेत होता. दरम्यान 23 मार्च 2018 रोजी कामगार चौकाजवळ भररस्त्यात त्याच्या अंगावर पाच ते सहा वेळा कार घालून, चिरडून त्याची हत्या करण्यात आली होती. भर दुपारी साडेतीन ते चार वाजता घडलेल्या या घटनेने औरंगाबाद शहर हादरून गेले होते. संकेत कुलकर्णी याला कारखाली चिरडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून त्याच्या साथीदारासह पळून गेला होता. त्यानंतर संकेतला त्याच्या सोबतच्या मित्रांनी जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते.


खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती 


या घटनेनंतर मृत संकेत कुलकर्णी याचा मित्र व या घटनेत जखमी झालेला विजय वाघ याने पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी फिर्याद दाखल करून यांतील प्रमुख आरोपी संकेत जायभाये व त्याचे साथीदार संकेत मचे, विजय जोक, उमर पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून प्रत्यक्षदर्शीचे जवाब नोंदवले होते. या निर्दयी घटनेच्या विरोधात औरंगाबादेतील जनतेत तीव्र रोष निर्माण झाला होता. पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. शासनाने या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. आतापर्यंत फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सह 20 च्या वर साक्षीदार तपासण्यात आले आहेत.


संकेत कुलकर्णी हत्या प्रकरण! औरंगाबादेत प्रेम प्रकरणातून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या


न्यायालयाच्या निकालाकडे औरंगाबादकरांचे लक्ष 


गेली चार वर्षे न्यायालयात चालेल्या या प्रकरणात आज 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी या खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी. एच. केळुसकर यांच्या न्यायालयात होणार आहे. दरम्यान यावेळी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम बाजू मांडत आहेत. त्यांना जिल्हा सरकारी वकील अॅड. अविनाश देशपांडे, अॅड. सिद्धार्थ वाघ साहाय्य करत आहेत, तर आरोपींच्या वतीने अॅड. राजेश काळे, अॅड. नीलेश घाणेकर, अॅड. भाले काम पाहत आहेत. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाच्या निकालाकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Crime News: औरंगाबादच्या सिल्लोडला एकाच दिवशी दोन मृतदेह सापडले; परिसरात खळबळ