Aurangabad Shiv Sena: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 35 पेक्षा अधिक आमदारांनी बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. दरम्यान या काळात अनेक बंडखोर आमदारांनी आपल्यावर अन्याय झाल्याचं बोलून दाखवले. त्यामुळे बंडखोरीचा निर्णय घेतल्याच त्यांनी स्पष्ट केले. मात्र आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत स्थानिक पातळीवर सुद्धा आता बंडखोरीची लाट येण्याची शक्यता आहे. कारण औरंगाबादमध्ये अशाच आशयाचे होर्डिंग पाहायला मिळाले. शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांनी 'साहेब आता निर्णय घ्या' असे बॅनर शहरभर लावले आहे.   


प्रत्येक पक्षात काही कार्यकर्त्यांची नाराजी असते. शिवसेनेत सुद्धा अशी नाराजी आहेच. मात्र आमदारांच्या बंडानंतर ही नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जुने शिवसैनिक आणि आमदार राहिलेले किशनचंद तनवाणी यांची नाराजी आता समोर येत असल्याची चर्चा आहे. तनवाणी भाजपमधून स्वगृही शिवसेनेत परतल्यानंतर अडीच वर्षांपासून त्यांना कुठलाही पद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. तर शहरात त्यांच्या समर्थकांनी बॅनर लावत 'खूप झाली प्रतीक्षा, खूप ठेवला विश्वास.., साहेब आता निर्णय घ्यावा लागेल' असा उल्लेख केला आहे. त्यामुळे तनवाणी सुद्धा शिंदे गटात सामील होण्याची चर्चा आहे.


शिवसेनेत दोन गट...


औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेत दोन गट यापूर्वी होतेच, पण त्यांचा विरोध परद्या मागून असायचा. मात्र आता शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट झाल्यानंतर पक्षातील नाराज शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. तर बंडखोर आमदारांचे समर्थक सुद्धा शिंदे यांच्या गटातच पाहायला मिळत आहे. त्यात गेली अनेक वर्षे पक्षात काम करूनही नेहमी डावलण्यात आलेले पदाधिकारी सुद्धा शिंदे गटात सहभागी होत आहे. 


सातपैकी पाच आमदार शिंदे गटात...


औरंगाबाद जिल्ह्यात विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांची संख्या सहा आहे. तर अंबादास दानवे विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. मात्र या सात आमदारांपैकी पाच आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. ज्यात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार,संजय शिरसाठ, रमेश बोरनारे आणि प्रदीप जैस्वाल यांचा समावेश आहे. तर उदयसिंग राजपूत आणि अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे.