Aurangabad Lok Sabha Constituency: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाकडून आत्तापासूनची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान याचवेळी औरंगाबाद (Aurangabad) लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या जागेवर युतीत असलेल्या शिंदे गट आणि भाजप दोघांनी एकाचवेळी दावा केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला गेल्यावेळी कारणीभूत ठरलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी आता मात्र आत्तापासूनच खैरेंना पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी विजयाचा दावा केला आहे. 


मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत असतात. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत देखील हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी सर्वच महत्वाचे पक्ष आणि नेते कामाला लागली आहे. अशातच राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाने हा एकाचवेळी या मतदारसंघावर दावा केला आहे. विशेष म्हणजे भाजप-शिवसेना युतीत प्रत्येकवेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला आहे. मात्र आता याच मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. तर निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून तशी तयारी देखील सुरु झाली आहे. पण तरीही हा मतदारसंघ आमच्याकडेच असणार असल्याचं शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांनी म्हटले आहे. 


खैरेंना हर्षवर्धन जाधवांचा पाठिंबा...


एकीकडे भाजप-शिंदे गटाकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघवर दावा केला जात आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून देखील तयारी करण्यात येत आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्यामुळे खैरे यांचा पराभव झाला, ते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील खैरे हेच पुढील खासदार होतील असा दावा करत त्यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 


इम्तियाज जलील यांचाही विजयाचा दावा...


एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारमधील दोन्ही पक्षाचे नेते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर दावा करत आहे. तिकडे ठाकरे गटाचे नेते खैरे देखील मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहे. पण याचवेळी आगामी लोकसभा निवडणुकीत आपलाच विजय होणार असून, पुढील खासदार पुन्हा मीच असणार असल्याचा दावा विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची चर्चा आत्तापासूनच सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा उद्यापासून सातवा टप्पा; असा असणार संपूर्ण दौरा