Aurangabad Crime News: औरंगाबादच्या शहर पोलिसांनी (Aurangabad City Police) चोरीच्या प्रकरणात केलेल्या एका कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीला काही महिन्यांपुर्वी ब्रेन ट्युमर (Brain Tumor) असल्याचे निदान झाले, पण उपचारासाठी पैसे नसल्याने एका चालकाने चक्क औषधोपचारांच्या खर्चासाठी चोरीचा मार्ग पत्कारल्याचे समोर आले आहे. अरुण यशंवतराव कुंटे (वय 40, रा. राजनगर, मुकूंदवाडी) असे आरोपीचे नाव असून, त्याने 1 लाख 18 हजार रुपये किमतीच्या वाहनांच्या बॅटऱ्या, एलईडी चोरल्या आहेत. याप्रकरणी मुकंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकूंदवाडी परिसरातून रविवारी विष्णु छगनराय तवार (49, रा. एन--१२)  यांच्या चारचाकी वाहनातून बॅटऱ्या, व्हिल कॅप, एलईडी, जॅक चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. त्यानुसार त्यांनी मुकूंदवाडी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली होती. त्यामुळे मुकंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या सुचनेवरुन पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांनी तपास सुरू केला. दरम्यान रामनगर परिसरात चारचाकी वाहनांचे व्हिल जॅक विक्री करण्यासाठी एक इसम विकत घेणाऱ्याचा शोध घेत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. 


पोलिसांकडून अटक...


माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आहेर यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा लावला. याचवेळी तिथे असलेल्या अरुण कुंटे याने पोलिसांना पाहून नजर चुकवुत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याची विचारपूस केली असता, काही महिन्यांपुर्वीच त्याच्या पत्नीला ब्रेन ट्युमरचा आजार जडला असून. त्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली. 


Aurangabad: आईला बाहेर पाठवून पित्याकडून लेकीवर अत्याचार, नात्याला काळीमा फासणारी घटना


दिवसा नोकरी, रात्री चोऱ्या


विशेष म्हणजे, अरुण स्वत: चालक असल्याने तो गाड्यांचे पार्ट्स चोरुन ते विकून पत्नीच्या आजरासाठी त्यावर दर महिन्याला लागणाऱ्या औषधांचा खर्च भागवत होता. सुरूवातीला त्यात यश मिळाले. त्यामुळे त्याने दिवसा चालकाची नोकरी करुन रात्री चोऱ्या सुरू करण्याचा ठरवलं. मात्र अखेर पोलिसांनी त्याला पकडले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटकही करण्यात आली आहे.