Aurangabad Crime News: औरंगाबादच्या वाळूज परिसरात खळबळ उडून देणारी घटना घडली असून, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास एटीएमवर डल्ला मारत लाखोंची रक्कम लंपास केली आहे. कटर मशीनच्या मदतीने वडगाव कोल्हाटी येथील युनियन बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले आहे. तर त्यातील 1 लाख 63 हजार रुपयेही चोरट्याने पळवले आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वडगाव कोल्हाटी येथील आण्णा भाऊ साठे चौकात युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. दरम्यान आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी एटीएममध्ये प्रवेश केला. त्यांनतर ओळख पटू नयेत म्हणून, एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन कट केले. त्यांनतर गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडून त्यातील 1 लाख 63 हजार रुपये लंपास केले.
लक्ष ठेवून फोडले एटीएम...
वडगाव कोल्हाटी परिसरात असलेल्या एटीएमच्या आजूबाजूला छोटी-मोठी शॉप आहेत. त्यामुळे पहाटेच्या वेळी तिथे लोकांची गर्दी नसते. म्हणूनच चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी आधी आजूबाजूची माहिती घेतली असावी. त्यांनतर सकाळी पहाटेच्या सुमारास कुणीही नसतांना एटीएमवर डल्ला मारत 1 लाख 63 हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे याठिकाणी सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक सुद्धा तैनात नव्हता. त्यामुळे याचाच फायदा चोरट्यांनी घेतला.
श्वान व ठसे तज्ञ पथकाकडून पाहणी...
एटीएम लुटल्याची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पंचनामा करत तपास सुरु केला आहे. दरम्यान श्वान व ठसे तज्ञ पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून, तज्ज्ञांनी आरोपींच्या हातांचे ठसे जमा केले आहे. सोबतच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र या घटनेने आजूबाजूला राहणाऱ्या व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: सत्तांतरानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर; मेळाव्यालाही लावणार हजेरी
Imtiaz Jaleel: गूगल मॅपने 'संभाजीनगर'चा उल्लेख करताच जलील संतापले; म्हणाले...