Aurangabad News: शहरातील खोकडपुऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या एका महिलने शुक्रवारी दुपारी एक वाजता गळफास घेत आत्महत्या केली. तर आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहत, मरण्याची इच्छा नाही, परंतु डोक्यावर झालेले कर्जाचे ओझे आता असह्य झाले असल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. आशा चंपालाल तरटे (45) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खोकडपुऱ्यात आशा दोन मुले, एक मुलगी व पतीसह भाडेतत्त्वावर रहातात. मोठा मुलगा 25 वर्षांचा असून तो खासगी नोकरी करतो, तर 17 वर्षीय मुलगा व 14 वर्षांची मुलगी शिक्षण घेते. पतीचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान शुक्रवारी मुलगी दुपारी शाळेतून घरी आल्यावर घर उघडताच आई लटकलेल्या अवस्थेत दिसताच ती जोरात ओरडली. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आशा यांचा मृतदेह उतरवून घाटीत पाठवला.
कोरोना काळात मुलाला नोकरी नाही, त्यात व्यवसाय ठप्प झाल्याने अशा यांच्या कुटुंबावर कर्जाचा मोठा डोंगर तयार झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्जाच्या चिंतेत त्या तणावाखाली गेल्या होत्या. दरम्यान लोकं पैसे मागण्यासाठी घरी येत असल्याने मुलांना घराला बाहेरून कुलूप लावून जाण्यासाठी त्या सांगायच्या. मात्र अथक प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसल्याने त्यांनी अखेर घरातच गळफास घेऊन जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय लिहलंय चिठ्ठीत...
“मी तणावातून आत्महत्या करत आहे. मला मरण्याची इच्छा नाही, परंतु कर्जामुळे मला हे पाऊल उचलावे लागत आहे. घरभाडेदेखील थकले आहे. माझ्या कुटुंबाला सांभाळा. त्यांची या कर्जातून सुटका करा,” असे चिठ्ठीत लिहिले आहे.
पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या..
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत गंगापूर येथील अश्विनी नितीन जेऊघाले (वय 29) या विवाहितेने शुक्रवारी पतीच्या जाचाला कंटाळून स्वतःच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. अश्विनीला पती नितीन हा मद्यपान करून सतत मारहाण करायचा. त्यामुळे अश्विनीने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.