Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या आगर नांदर गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका एसटी (ST) कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, त्याला पैठण येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरु आहे. अशोक थोरात (रा. आगर नादंर ता. पैठण, जि.औरंगाबाद) असे या कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पैठण आगारात कार्यरत असलेले अशोक थोरात यांनी दुपारच्या सुमारास आगारातच विष प्राशन केले. आगारप्रमुख व एसटी कर्मचारी (ST Mahamandal) यांच्यात ड्युटी गृपवरुन वाद झाला होता. त्यामुळे थोरात यांनी पैठण आगारातच विष प्राशन केले. त्यांना तत्काळ इतर कर्मचाऱ्यांनी पैठण येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


आगारप्रमुखाचा फोन बंद...


थोरात यांच्या कुटुंबातील सदस्य आणि इतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्युटी गृपवरुन थोरात आणि आगारप्रमुखामध्ये वाद झाला होता. त्यामुळेच थोरात यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तर या घटनेनतर आगारप्रमुखाचा फोन बंद येत असल्याने त्यांची बाजू कळू शकली नाही.