Aurangabad Crime News: शहरातील नामांकीत ज्वेलरी शॉप मधुन हातचालाखीने सोने लंपास करणाऱ्या दोन महिलांना औरंगाबाद शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. चोरी करून सिनेस्टाईल फरार होणाऱ्या या महिलांचा पोलिसांकडून गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरु होता. मात्र एखांद्या चित्रपटातील चोराप्रमाणे त्या फरार होत असल्याने,पोलिसांच्या हाती लागत नव्हत्या. त्यांनतर पोलिसांनी तब्ब्ल तीनशे सीसीटीव्ही कॅमरे तपासात सखोल तपासाअंती या दोन्ही महिलांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर बुशरा परवीन शेख नईम ( वय 35 वर्ष, रोजाबाग, औरंगाबाद ),मुन्नी बेगम हुसेन खान ( वय 30 वर्ष, रा.गल्ली नंबर बी-01, सजयनंगर, औरंगाबाद ) असे आरोपी महिलांचे नावं आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील रिलायंस ज्वेलर्स, पीएनजी  ज्वेलर्स, बामनहरी पेठे ज्वेलर्स, सावंत ज्वेलर्स इत्यादी नामांकित ज्वेलरी शॉपमधून तोंडाला स्कार्फ बांधुन हात चालाखीने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा पोलीस गेल्या काही दिवसांपासून शोध घेत होते. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील कमांड कंट्रोल सेंटरचे 224 आणि  75 खाजगी सीसीटीव्ही कॅमरे तपासले. ज्यात त्यांना तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन महिला गुन्हा करताना आढळून आल्यात. त्यांनतर पोलिसांनी त्यांची ओळख काढत अखेर बेड्या ठोकल्या. 


सिनेस्टाईल चोरी... 


दोन्ही आरोपी महिला प्रत्येकवेळी चोरी करताना ओळख पटू नयेत म्हणून खूप काळजी घ्यायच्या. रिक्षात बसताना ज्याठिकाणी सीसीटीव्ही नाहीत याची खात्री करूनच रिक्षात बसायच्या. थोड्या अंतरावर गेल्यावर गल्ली-बोळात उतरून पायी चालत जाऊन पुन्हा दुसऱ्या रिक्षाने प्रवास करायच्या. स्वतःची ओळख लपवण्यासाठी एका अपार्टमेन्टच्या पार्किंगमध्ये जाऊन बुरखा घालायच्या. त्यामुळे पोलिसांनी शोध घेऊनही या आरोपी महिला हाती लागत नव्हत्या. 


पोलसांनी असा लावला शोध... 


अनेक प्रयत्न करून सुद्धा या महिला हाती लागत नसल्याने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी विशेष पथक तयार केले. ज्यांच्याकडे हा तपास देण्यात आला. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी शहरातील तीनशे सीसीटीव्ही तपासले. ज्यात दोन संशयित महिला आढळून आल्या. त्यानुसार तपास केला असता गुन्हा करते वेळी महिलांच्या अंगात घातलेले कपडे, चप्पल आणि  नंतर घातलेल्या बुरख्या वरील डिझाईन यावरुन फुटेजचे बाराकईने आवलोकन केले असता संशयित महिलाच आरोपी असल्याचे लक्षात आले. तसेच त्या भागातील रिक्षा चालकांची मदत घेवून आरोपी महिलांचा पत्ता शोधून काढला. तर चोरीचा लाखो रुपयांचा मुद्देमाल सुद्धा त्यांच्या ताब्यातून घेण्यात  आला आहे.