Aurangabad Crime News: रस्त्यावर सापडलेल्या सीम कार्डच्या नंबरचा वापर करून, एका माथेफिरू तरुणाने स्वतःचे नग्न फोटो गावातील महिलांना व्हॉटस्ॲपवरून पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात हा सर्व प्रकार घडला आहे. सायबर पोलिसांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाने ह्या घटनेचा खुलासा झाला आहे. अभिषेक अशोक वाघ (20, रा. शिवना, सिल्लोड) असे या माथेफिरू तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका तरुणाने औरंगाबाद ग्रामीण सायबर पोलिसांकडे आपल्या नावाच्या सिमकार्डचा नंबर वापरून कोणीतरी व्हॉटस्ॲपचा वापर करत असल्याची तक्रार दिली होती. विशेष म्हणजे या नंबरवरून गावातील महिलांना अश्लील फोटो सुद्धा पाठवले जात असल्याची माहिती या तरुणाने पोलिसांना दिली. विशेष म्हणजे यामुळे गावात जातीय तेड निर्माण होण्याची शक्यता सुद्धा तरुणाने वर्तवली. त्यामुळे घटनेची गंभीरता लक्षात घेत सायबर पोलिसांनी याची माहिती थेट पोलीस अधीक्षक यांना दिली.
पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी तत्काळ सायबर पोलिसांना वेगाने तपास करण्याच्या सुचना केल्या. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. तब्बल आठ दिवस सायबर पोलिसांनी त्या नंबरबाबत सर्व माहिती गोळा केली. पुढे पोलिसांच्या तपासात अभिषेक चे नाव समोर आले. त्यांनतर पोलिसांनी सापळा रचुन साध्या वेशात त्याचे घर गाठले. तेव्हा अभिषेक परिसरातील एका किराणा दुकानावर उभा होता. तेथेच त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
असा अडकला...
अभिषेकला काही दिवसांपुर्वी ते सीम कार्ड बसस्थानकावर सापडले. त्याने आधी स्वत:च्या मोबाईल मध्ये तो सिमकार्ड टाकून त्याचा क्रमांक जाणुन घेतला. त्यानंतर लहान बहिणीला मोबाईलची कामासाठी गरज असल्याचे सांगून तीचा मोबाईल वापरण्यासाठी घेतला. त्यावर त्या क्रमांकाने व्हॉटस्ॲप इंस्टॉल करुन विकृत प्रकार सुरू केले. मात्र सुरवातीला नंबर जाणून घेण्यासाठी त्याने सिमकार्ड आपल्या मोबाईलमध्ये टाकला आणि तिथेच फसला. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत त्याचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे अभिषेकवर जालना पोलिसात सुद्धा गुन्हा दाखल असून, तेथील पोलीस सुद्धा त्याला तपासाठी ताब्यात घेऊ शकतात.