Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील आणि परिसरातील भागात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करताना प्रशासन सुद्धा हतबल होतांना पाहायला मिळत आहे. अशात आता पिण्याच्या पाण्यावरून एकमेकांवर थेट जीवघेणे हल्ले केले जात आहे. वाळूज महानगर भागात नळाचे पाणी भरण्यावरून दोन कुटुंबीयांत जोरदार हाणामारी होऊन चौघांना चाकूने भोसकल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. दरम्यान यातील जखमी प्रभाकर चोरमले (49) यांचा 11 जून रोजी उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. अन्य तिघांवर घाटीत उपचार सुरू असून एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, रांजणगाव शेणपुंजी येथील प्रभाकर चोरमले हे कुटुंबासह किरायाच्या घरात राहतात. बाजूलाच दुसऱ्या खोलीत भाऊसाहेव दळवी यांचे कुटुंब सुद्धा किरायाने राहतात. काही दिवसांपासून सामायिक नळाचे पाणी भरण्यावरून दळवी आणि चोरमले कुटुंबात वाद व्हायचे. दरम्यान 4 जून रोजी सायंकाळी दोन्ही घरांतील महिलांचा पुन्हा पाण्यावरून वाद झाला. या वादानंतर रात्री दळवी कुटुंबातील तिघांनी चोरमलेंच्या घरी जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ केली.


यावेळी आईला शिवीगाळ केली जात असल्याने संकेत चोरमले हा समजावण्यासाठी घराबाहेर आला. यावेळी योगेश दळवी याने संकेतवर चाकूने वार केले. संकेतने मदतीसाठी आरडाओरडा केला असता त्याचे आई-वडील आले. योगेशने प्रभाकर चोरमले यांच्यावर सुद्धा चाकूने दोन तर, चोरमले यांच्या पत्नीवर एक वार केला होता. तेव्हापासून चौघांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र यातील जखमी प्रभाकर चोरमले (49) यांचा 11 जून रोजी उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला.  


पाणी प्रश्न गंभीर...


औरंगाबाद शहरातच नव्हे तर आता परिसरातील आणि ग्रामीण भागात सुद्धा पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर पिण्याच्या पाण्यावरून आता वाद होताना सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यातच वाळूजच्या घटनेनंतर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती किती गंभीर बनली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.