Aurangabad News: औरंगाबाद शहर गुन्हे शाखा आणि वेदांतनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण सहा चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे वेदांतनगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीपैकी एका आरोपी महिनाभरापूर्वीच हर्सूल कारागृहातून सुटला होता. कारागृहातून सुटताच त्याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने पुन्हा तीन मोटारसायकल चोरल्याचं पोलीस तपासात समोर आले. तर गुन्हे शाखेच्या पथकाने सुद्धा दोन मोटारसायकल चोरांसह तीन दुचाकी जप्त केल्या आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी, वेदांतनगर आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


कारागृहातून सुटताच पुन्हा चोरी...


नामदेव वामराव आढागळे (वय 43 वर्षे) यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरासमोरुन त्यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी पोलीस तपास करत असताना आरोपी CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होता. त्यामुळे पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता महिन्याभरापूर्वी हर्सूल कारागृहातून सुटून आलेला आरोपी शोऐब कुरैशी (रा. चिखलठाणा)  हा मोटार सायकल घेवुन जातांना दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपला साथीदार सचिन मिसाळ ( रा. राजणगाव वाळूज) याच्या मदतीने एकूण तीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार राजणंगाव एमआयडीसी वाळूज येथुन तीन मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून, याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गुन्हे शाखेची कारवाई...


गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, साजापुर येथून सागर संतोष केदारे ( रा. साजापुर ता. जि. औरंगाबाद)  हा चोरीची मोटरसायकल विक्री करण्यसाठी येणार आहे. त्यामुळे पथकाने त्याला साजापूर येथेच जागेवर ताब्यात घेतले. यावेळी त्याला विचारपूस केली असता त्याने आपण दोन मोटारसायकल चोरल्या असून साजापूर येथे लपवून ठेवल्या असल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही मोटारसायकल त्याच्या ताब्यातून जप्त केल्या आहेत. तर दुसऱ्या एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाने शेख इस्माईल शेख युसुफ (रा. रेंगटीपुरा, जिन्सी रोड, औरंगाबाद) यालाही ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी संबंधीत पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.