Aurangabad Police Mission Wanted Campaign: औरंगाबाद (Aurangabad) शहर पोलीस हद्दीत फरार आरोपींच्या विरोधात पोलीस अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. कारण फरारी आणि वॉन्टेड आरोपींचा फुगलेला आकडा कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी प्रत्येक ठाण्यात विशेष पथक स्थापन करून 'मिशन वॉन्टेड' राबविले. विशेष म्हणजे या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून, 9 ऑगस्ट 2022 पासून ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत तब्बल 554 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात 38 फरारी, 421 पाहिजे असलेले आणि 95 आरोपी अजामीनपात्र वॉरंटमधील आहेत.


औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयाच्या रेकॉर्डवर पाहिजे, फरारींचा आकडा दोन हजार 200 च्या पुढे गेला होता. हा प्रकार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गांभीर्याने घेतला. न्यायमूर्तींनी थेट पोलिस आयुक्तांना याबाबत जाब विचारला. त्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक अधिकारी आणि तीन ते चार पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक स्थापन केले. या पथकाला केवळ फरार, वॉन्टेड आरोपी शोधण्याची जबाबदारी देण्याचे आदेश दिले. मात्र, ठाणेदारांनी या पथकाला अनेकदा बंदोबस्त व इतर कामे लावली, तरीही पथकांनी मिळेल त्या वेळेत तांत्रिक तपास करून आरोपींची शोध मोहीम राबविली. 17 पोलिस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने मिळून तब्बल 554 आरोपींना अटक करून हा आकडा दोन हजारांपर्यंत कमी केला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तालयाच्या रेकॉर्डनुसार सध्या 201 आरोपी फरार असून, ज्यांना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. तसेच, वेगवेगळ्या गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या आरोपींची संख्या 1 हजार 855 एवढी आहे. यात 400 आरोपी महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. 500 आरोपींची पूर्ण नावे व पत्ते नाहीत. तसेच, 400 आरोपी जिल्ह्याबाहेरचे आहेत. उर्वरित आरोपींचाही पथके शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक तथा गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. 


26 गुन्ह्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या...


दरम्यान एकीकडे फरार आरोपींचा शोध घेतला जात असताना औरंगाबाद शहर पोलिसांनी भरदिवसा शहरात येऊन बिनधास्तपणे अपार्टमेंटमध्ये घसून, बंद घरे फोडणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहे. तांत्रिक तपास करून आरोपी निष्पन्न झाल्यावर दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने तब्बल 15 दिवस सापळा लावून या आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. या आरोपींकडून घरफोडीच्या पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यांनी औरंगाबाद, जालना, पुणे, नाशिकसह जळगाव आदी जिल्ह्यांत डल्ला मारला आहे. राजेंद्र उर्फ राजन बाबासाहेब राऊत (राजू बाबुराव मुचकुले) (वय 26 वर्षे, रा. साईनगर, परतूर जि. जालना) आणि ओम फकीरा पवार (वय 20 वर्षे, रा. परतूर, जि. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर यातील आरोपी राजेंद्र राऊत विरोधात वेगवेगळ्या जिल्ह्यात 26 गुन्हे दाखल आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Aurangabad Crime News: लाच लुचपत विभागाने कारवाई केलेल्या ऋषिकेश देशमुखच्या घरात पैसे मोजण्याची मशीन सापडली