Rajesh Tope: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) औरंगाबाद दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत आज पैठणमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी माजी आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते उपस्थित आहे. मात्र याचवेळी राजेश टोपे यांचे भाषण सुरु असतानाच 'राष्ट्रवादी पक्ष म्हणजे 'एकनाथां'च्या (Eknath) विचाराने चालणारी पार्टी' असल्याचं त्यांच्या वक्तव्याने सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. 


शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नावाची जगभरात चर्चा झाली आहे. विशेष गुगलवर देखील एकनाथ शिंदे नाव मोठ्याप्रमाणावर सर्च करण्यात आले. त्यातच राज्यातील गावा-गावात एकनाथ शिंदे नाव माहित झाले आहे. दरम्यान असे असताना पैठणमधील आजच्या सभेत बोलताना राजेश टोपे यांनी, 'राष्ट्रवादी पक्ष म्हणजे 'एकनाथां'च्या विचाराने चालणारी पार्टी' आहे, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य ऐकून थोड्यावेळेसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण टोपे यांना संत एकनाथ म्हणायचं होतं असे कळताच नेते कार्यकर्त्यांच्या तोंडावर स्मितहास्य पाहायला मिळाले. मात्र याची सभास्थळी जोरदार चर्चा पाहायला मिळाली. 


नेमकं काय म्हणाले राजेश टोपे...


यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे काय तर शेतकऱ्यांची पार्टी, सर्वधर्मसमभाव मानणारी पार्टी, 'एकनाथा'च्या विचाराने चालणारी पार्टी, रंजले गाजले सर्वांना आपली म्हणणारी पार्टी आणि त्यामुळे अशा पार्टीत सर्वांना घेऊन चालण्याचे कार्य केले जाते. तसेच जे कथनी आहे तीच करणी आहे. पैठण तालुक्यात अनेक महत्त्वाची कामे फक्त राष्ट्रवादीमुळे झाली आहेत, असे राजेश टोपे म्हणाले. 


शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?


अतिवृष्टी होऊन किती दिवस झाले, पण शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. राज्यात आलेल्या या नवीन सरकारला आठ महिने झाले आहेत. त्यांना सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, पण शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी वेळ नाही. आम्ही ज्या-ज्यावेळी विधानसभेत आवाज उठवला त्या-त्यावेळी यांनी आत्ताच देऊ असे सांगितले. मात्र आठ महिने उलटले यांनी अजूनही अनुदान मिळाले नाही. पीक विम्याचे पैसे देखील अजूनही मिळाले नाही. हजारो कोटी रुपये विमा कंपन्या खाऊन बसल्या आहेत. या कंपन्यांवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे, ती मदत मिळत नसल्याचा आरोप राजेश टोपे यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ajit Pawar: राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होतायत, सरकार आणि पोलीस यंत्रणा झोपली आहे का? अजित पवार संतापले