Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) म्हाडा कॉलनी परिसरात एका तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कंपनीत नोकरी करणारी युवती ऑफिसला जाताना बसमध्ये चढताच एका 30 वर्षीय तरुणाने भर रस्त्यात 'मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव' असे म्हणत बसमधून खाली ओढून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना 30 डिसेंबर रोजी म्हाडा कॉलनी परिसरातील रोजगार कार्यालयाजवळ घडली. तर सतीश मधुकरराव आठवले (वय 30, रा. दिघी, ता. कारंजा, जि. वाशिम, सध्या रा. औरंगाबाद) असे त्या आरोपीचे नाव आहे. तसेच आरोपी सतीश विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे एकाच गावचे रहिवासी आहेत. पीडिता ही कुटुंबांसह शहरात राहत असून शेंद्रा एमआयडीसी येथे एका खासगी कंपनीत काम करते. दरम्यान नेहमीप्रमाणे ती आपल्या कामानिमित्ताने ऑफिसला जाण्यासाठी रोजगार कार्यालयाजवळ थांबली होती. यावेळी आलेल्या कंपनीच्या बसमध्ये बसण्यासाठी चढत असतानाच आरोपी सतीश आठवले तिथे पोहचला. पीडीत तरुणी बसमध्ये चढत असतानाच तिचा हात पकडून तिला खाली ओढले. तसेच मला तुझ्याशी लग्न करायचे असून, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव' असे म्हणत विनयभंग केला. इतकेच नव्हे तर दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसात धाव घेत आठवलेविरोधात तक्रार दिली असून, त्यानुसार मुकंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी समज देऊनही सुरु होता त्रास...


धक्कादायक म्हणजे याआधी देखील सतीश आठवले त्रास देत असल्याने तरुणीने पोलिसांची मदत घेतली होती. मात्र त्याला पोलिसांनी समजावून सांगूनही त्याच्याकडून पीडितेला त्रास देणे सुरूच होते. तसेच आरोपी पीडितेच्या घरीही गेला होता. तेव्हा पीडितेच्या आईने आरोपीला समजावूनही सांगितले होते. मात्र त्याचा त्रास देणं बंद झालं नाही. त्यापुढे जात त्याने भर रस्त्यात विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. 


महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा विषय 


गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात घडत असलेल्या घटना पाहिल्यास, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे. कारण काही दिवसांपूर्वी शाळेतील लहान मुलींचा रिक्षाचालकाने केलेला विनयभंग, विद्यापीठात एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळण्याचा झालेला प्रयत्न, तसेच एका रिक्षाचालकाने चालत्या रिक्षात शिकवणीला जाणाऱ्या मुलीचा केलेला विनयभंग अशा घटना समोर आल्या आहेत. त्यात आता कंपनीत कामाला जाणाऱ्या तरुणीला माझ्याशी लग्न कर आणि दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या सर्व घटना पाहता महिला सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे. 


Aurangabad Crime News: बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याने मित्रमंडळी हिणावत होती; म्हणून भर रस्त्यात मेहुण्याला संपवलं