J P Nadda in Aurangabad: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. दरम्यान नड्डा यांची औरंगाबादमध्ये संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा (Public Meeting) देखील होणार आहे. त्यांच्या या सभेसाठी भाजपकडून (BJP) जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच सभेतून नड्डा हे लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) रणशिंग फुकणार असल्याचं सुद्धा बोलले जात आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नड्डा यांचा हा औरंगाबादचा पहिला दौरा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. यासाठी भाजपकडून स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या बैठका एकामागून एक सुरूच आहे. दरम्यान याच लोकसभा निवडणुकीचे रणशिंग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा औरंगाबादच्या जाहीर सभेतून फुकणार आहे. त्यासाठी आज औरंगाबादमध्ये नड्डा यांची जाहीर सभा पार पडत आहे. औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर संध्याकाळी पाच वाजता ही जाहीर सभा होणार आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेला किमान 25 हजार लोकांची गर्दी जमवण्याचा निश्चय भाजपकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचाच लक्ष लागला आहे.
नड्डा काय बोलणार?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जे पी नड्डा औरंगाबाद दौऱ्यावर येत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि त्यानंतर झालेलं राज्यातील सत्तांतर या सर्व परिस्थितीवर जे पी नड्डा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सोबतच भाजपकडून सुरू असलेल्या लोकसभेची तयारी पाहता त्या दृष्टीने नड्डा काय बोलणार याकडे भाजप नेत्यांचं लक्ष लागला आहे. त्यामुळे नड्डा यांचा औरंगाबाद दौरा महत्त्वाचा समजला जातोय.
भाजपचे मंत्री लागले कामाला!
जे पी नड्डा यांचा दौरा 27 डिसेंबरला जाहीर झाला. त्यामुळे या सभेची तयारी करण्यासाठी भाजपला फक्त पाच दिवसांचा कालावधी मिळाला. या कमी कालावधीत नड्डा यांच्या सभेची तयारी करणं भाजपच्या स्थानिक नेत्यांसमोर मोठा आव्हान होतं. विशेष म्हणजे नड्डा यांचा औरंगाबाद दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि राज्यातील सहकार मंत्री अतुल सावे स्वतः लक्ष ठेवून होते. त्यामुळे आज होणाऱ्या नड्डा यांच्या जाहीर सभेसाठी किती गर्दी जमते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.