Aurangabad Crime News: औरंगाबादच्या नारेगाव भागात एक संतापजनक घटना समोर आली असून, मैत्रीणीचा बदला घेण्यासाठी तिच्या मुलीवर आपल्या विवाहित मुलाला अत्याचार करायला लावल्याचा घाणेरडा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी महिलेने पिडीत मुलीवर अत्याचार करतांना तिथे उभे असलेल्या आपल्या पतीला व्हिडिओ सुद्धा काढायला लावला असल्याचे सुद्धा समोर आले आहे. पिडीत मुलगी चार महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर ही घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजवान मुनाफ सय्यद (वय 21),जफर (पूर्ण नाव मा हित नाही),शमीमबी मुनाफ सय्यद असे आरोपींचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीची आई आणि आरोपी महिला शमीमबी या मैत्रीण होत्या, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठी शमीमबी गेली काही दिवस प्रयत्न करत होती. दरम्यान 14 फेब्रुवारी रोजी 15 वर्षांची पिडीत मुलगी घरी एकटी असतांना शमीमबीचा मुलगा रिजवान याने घरात घुसून बळजबरीने अत्याचार केला. त्यांनतर 18 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता रिजवान त्याचा सावत्र बाप जफर आणि आई शमीमबी यांनी मुलगी घरात एकटी असतांना बळजबरीने घरात प्रवेश केला. त्यांनतर जफरने चाकूचा धाक दाखवला तर रिजवान याने पुन्हा मुलीवर अत्याचार केला. 


बापाने विवस्त्र होऊन बनवला व्हिडिओ...


पिडीत मुलीवर रिजवानने अत्याचार करायला सुरवात केल्यावर तिथे त्याचा सावत्र बाप जफर विवस्त्र होऊन उभा होता. त्यांनतर रिजवान अत्याचार करत असल्याचा त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ सुद्धा बनवला. विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना रिजवानची आई शमीमबी ही घराबाहेर राखणदारी करत होती. त्यांनतर मुलीला या बाबत कुणालाही काहीही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिघांनी दिली. 


मुलगी चार महिन्याची गर्भवती  


पिडीत मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तिने घडलेला प्रकार कुणालाच सांगितला नाही. मात्र अचानकपणे मुलीच्या वागण्यात बदल झाला. तिची प्रकृती खालावली म्हणून आईने विचारणा केली. तेव्हा मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या आईने तत्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार देत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.