Aurangabad News Crime: औरंगाबादच्या एकाला दारूच्या नशेत डायल 112 वर कॉल करणं चांगलंच महागात पडले आहे. फोनवरून गोळीबार झाल्याची माहिती देऊन पसार झालेल्या व्यक्तीला तीन दिवसांनंतर पोलिसांनी शोधून चौकशी केली असता, त्याच्याच घरात गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळल्याचे समोर आले. आता पोलिसांनी त्यालाच गजाआड केले असून न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. संतोष रघुनाथ साबळे असे आरोपीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26  सप्टेंबरला संतोष साबळेने डायल 112  वर कॉल करून अनिल माळवे नावाच्या व्यक्तीने आपल्यावर गोळीबार करून जखमी केले असल्याची माहिती दिली. तर लवकर मदत पाठवा, अशी विनंतीही केली होती. पोलिसांनी तात्काळ त्याच्या मोबाइल लोकेशनवर पोलीस पथक पाठवले. मदतीसाठी गेलेल्या पथकाने भालगाव, आपतगाव, झाल्टा शिवारात त्याचा शोध घेतला मात्र, संतोष साबळे कुठेही सापडला नाही.


ग्रामीण पोलीस संतोष साबळे याचा शोध घेत असतानाच असाच कॉल त्याने शहर पोलिसांनाही करून अशीच माहिती दिली. शहर पोलिसांनीही त्याचा शोध घेतला मात्र, तो कुठेही मिळून आला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आधी अनिल माळवेचा शोध घेतला. दरम्यान तो घरी मिळून आला. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने, असा काहीही प्रकार मी केलेला नसल्याचं सांगितले. याबाबत तसे पुरावेही त्याने पोलिसांना दिले.त्यामुळे पोलिसांनी अखेर संतोषला मोबाइल लोकेशनवरून शोधले. त्याला चौकशीसाठी ठाण्यात नेले असता त्याने दारूच्या नशेत कॉल केल्याची कबुली दिली.


अन् स्वतःच अडकला


संतोषला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दारूच्या नशेत कॉल केल्याचे कबूल केलं.  दरम्यान पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने बेडरूममधील पिस्टल व दोन जिवंत काडतुसे पोलिसांना काढून दिली. त्याच्याकडून 7.65 एमएमचे पिस्टल व त्याच आकाराची दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी पंचनामा करून त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. 


कर्नाटकातून आणलेला नशेच्या औषधींचा साठा पकडला...


दुसऱ्या एका कारवाईत एका ट्रक चालकाने कर्नाटकातून आणलेला नशेच्या औषधींचा तीस हजार रुपयांचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. औरंगाबाद शहर पोलिसांच्या सिटी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अल्ताफ बशीर अहेमद पठाण (वय 24 , दानिश मशिदीजवळ, दानिश पार्क, नारेगाव) असे आरोपीचे नाव आहे. एक ट्रक चालक कर्नाटकातून नशेच्या औषधींचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावत अल्ताफला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: मोहटादेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या औरंगाबादच्या भाविकांच्या कारला अपघात, दोघांचा मृत्यू


Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही मुलं पळवणारी टोळी सक्रीय नाही, 'त्या' तीन घटनाही फक्त अफवाच