Aurangabad Crime News: औरंगाबादच्या पैठण येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर रविवारी एका तोतया 'सीबीआय'च्या अधिकाऱ्यांने रेड केल्याची घटना समोर आली होती. तर लोळगे यांच्या समयसूचकने या तोतया 'सीबीआय'च्या अधिकाऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र या सर्व घटनेचा खरा मास्टर माइंड भाजपचा एक माजी पदाधिकारी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रघुनाथ इच्छैय्या असे या मास्टर माइंडचे नाव आहे. 


नेमकं काय घडलं...


सुरज लोळगे यांचा भाऊ ज्वेलरी शॉपमध्ये असताना विट्ठल हारगुडे नावाचा व्यक्ती दुकानात आला. त्याच्या हातात एक फाईल आणि डायरी होती. त्यांनतर त्याने लोळगे यांच्या भावाला आपण सीबीआय ऑफिसर असून , तुमच्या दुकानावर रेड पडली असल्याच सांगितले. त्यामुळे सुरज यांच्या बंधूने याची माहिती त्यांना फोनवरून दिली. माहिती मिळताच सुरज दुकानात आले. पण त्यांना त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून संशय आला. त्यामुळे त्यांनी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना फोन करून माहिती दिली. त्यांनतर या तोतया 'सीबीआय' अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पैसे उकळण्यासाठी रचला डाव...


रघुनाथ इच्छैय्या या सर्व प्रकरणाचा मास्टर माइंड असून, तो पैठण येथीलच राहणारा आहे. त्यामुळे सुरज यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी त्याने पुण्यातील विट्ठल नामदेव हारगुडे ( वय 50, बिबवेवाडी पुणे) आणि धनंजय गाठे (बिबवेवाडी पुणे)  या दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना पैठण येथे बोलावून घेतले. त्यांनतर पैठणच्या एका लॉजमध्ये त्यांनी शनिवारी मुक्काम सुद्धा केला. दुसऱ्या दिवशी लोळगे यांची दुकान गाठली. पण पोलिसांच्या एन्ट्रीमुळे त्यांचा डाव फसला. हारगुडे याला पोलिसांनी ताब्यात घेताच गाडीत बसलेला धनंजय गाठे फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी रघुनाथ इच्छैय्या याच्यासह पाच लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. 


असा अडकला तोतया अधिकारी...


अधिकाऱ्यांसारख राहणीमान करून आलेल्या या तोतया 'सीबीआय' अधिकाऱ्याला सुरज यांनी सुरवातीला खरोखरचा अधिकारी समजलं. त्याच्या ओळखपत्रावर पोलीस आयुक्त सीबीआय असा उल्लेख होता. पण त्यांनतर ओळखपत्र निरखून पाहिल्यावर सुरज यांना संशय आला. त्यामुळे त्यानी पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी आधी या तोतया 'सीबीआय' अधिकाऱ्याची विचारपूस करत चौकशी केली. त्यांनतर ओळखपत्र आणि अधिकारी दोन्ही बनावट असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यामुळे त्याला पैठण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, लोळगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांनी दिली आहे.