Aurangabad News: माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल हे वाक्य प्रचंड चर्चेत आले होते. आता हेच वाक्य औरंगाबाद महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याला लागू होत आहे. कारण महापालिकेतील निवृत्त शहर अभियंता सखाराम पानझडे यांना आतापर्यंत दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता तिसऱ्यांदा मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जाता-जाता पुन्हा एकदा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे.
मनपाचे एवढे प्रेम कशासाठी....
पानझडे यांना सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. शहर अभियंता पदावरून पानझडे हे 30 जून 2021 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सुरुवातीला त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली गेली. आता पुन्हा एकदा मनपाकडून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे पानझडे यांच्यावर एवढे प्रेम कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी झाला होता विरोध...
पानझडे हे जून 2021 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे काही संघटनांनी याला विरोध केला होता. तर एका प्रकरणात झालेल्या चौकशीत पानझडे यांच्यावर सुद्धा दोषारोप सिद्ध झाले असून, त्यांची मुदतवाढ रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांना मुदतवाढ मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
आयुक्तांचा भ्रष्टाचाराच लपवण्यासाठी मुदतवाढ
मागे केलेला चुकीचा कारभार व्यवस्थितपणे करण्यासाठी मुदतवाढ आहे. फक्त पानझडेच नाही तर एकूण तीन जणांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. हे सर्वजण आयुक्तांचे खास असून, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सावरासावर करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केला आहे .तसेच आम्ही हे सर्व उघड पाडणार असल्याचेही केणेकर म्हणाले.