Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांनी (Aurangabad City Police) नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मोठी कारवाई केली असून, 22 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजाची (Cannabis)  वाहतुक करतांना स्कोडा कारसह (Skoda Car) दोघांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्या ताब्यातून एकूण 15 लाख 64 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) ही कारवाई केली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे सपोनि मनोज शिंदे यांना माहीती मिळाली होती की, काही व्यक्ती चिकलठाणा गावाकडुन कॅम्ब्रीज चौकाकडे स्कोडा कार (क्रमांक MH- 20 BC-8598)  मध्ये गांजासारखा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता घेवुन जाणार आहे. त्यामुळे माहिती मिळताच शिंदे यांनी याबाबत वरीष्ठांना माहिती देऊन, गुन्हे शाखेचे पथक, पंच, तज्ञ, परीक्षक, वजनकाटाधारक यांच्यासह चिकलठाणाजवळील केंब्रीज चौकातील हॉटेल साई वंदन कंदुरी स्पेशल येथे सापळा लावला. 


दरम्यान रात्री 11:45 वाजता मिळालेल्या माहितीतील स्कोडा कार चिकलठाणा कडुन येतांना पोलिसांना दिसली. त्यामुळे सापळा लावून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने गाडी थांबवली. गाडी थांबवून चौकशी केली असता, त्यात दोन जण आढळून आले. त्यांना नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नावं उमेर खान इक्बाल खान (वय 28 वर्ष, रा यासीननगर, यासीन मश्जिद जवळ, हर्सुल परिसर, औरंगाबाद), अकबर खान इक्बाल खान, (वय 26 वर्ष, रा यासीननगर, यासीन मश्जिद जवळ, हर्सुल परिसर, औरंगाबाद) असे सांगितले. 


कारच्या डिक्कीत सापडला गांजा...


दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी संशयीत काराची पाहणी केली असता, कारच्या डिक्कीत ठेवलेल्या एका गोणीत गांजा मिळुन आला. सोबत असलेल्या वजनकाटा धारकाने वजन केला असता 22  किलो 700 ग्रॅम वजानाचा गांजा यावेळी मिळुन आला.  त्यामुळे पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी हा गांजा सैय्यद युनुस सैय्यद मलीक (रा. पुष्पा गार्डन, चिकलठाणा, औरंगाबाद) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी एन.डी.पी.एस कायद्याच्या कलम 20 (ब), 8 (क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर कारवाईतील गांजा आणि गुन्ह्यातील कारसह एकूण 15 लाख 64 हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे एम. सिडको यांच्या ताब्यात दिला आहे. 


Aurangabad : औरंगाबाद हादरलं! एकाच दिवसांत जिल्ह्यात चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ