Aurangabad Crime News: आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवीन संकट उभं राहिले आहे. कारण औरंगाबादमध्ये जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत असून, एकाच गावातील तब्बल 14 जनावरे एकाच रात्रीतून चोरीला गेले आहेत. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील मुधलवाडी गावातील ही घटना असून, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जनावरे चोरून गाडीत भरून नेत असतांना चोरं सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 


याप्रकरणी शेख रईस शेख मजुर (वय 30 वर्ष, रा. अकबर नगर मुघलवाडी ता. पैठण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे कापड दुकाण आहे. तसेच त्यांच्याकडे एक गाय असुन ती घरासमोर बांधलेली असते. तर गाय सांभाळण्यासाठी कोणी नसल्याने तिला खुट्यावर बांधुन चारा पाणी करण्यात येते. दरम्यान सोमवारी रात्री 10.00 वाजता गाईला चारा पाणी करुण रईस हे घरात झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठुन घराबाहेर आले असता त्यांना घरासमोर बांधलेली गाय दिसली नाही. त्यामुळे त्यांनी गावात आणि परिसरात शोध घेतला. मात्र गाय मिळून आली नाही. 


रात्रीतून 14 जनावरे चोरीला...


गाय शोधण्यासाठी रईस हे पिपळवाडी फाटा येथे पोहचले असताना त्यांना गावातील जावेद अहमद शेख,  शेख फेरोज शेख लाल, शेख जाकेर रशीद,  मैय्या हकिम, हारुन रहेमुद्दीन शेख ( सर्व रा मुघलवाडी)  हे भेटले. याचवेळी आमच्या सुद्धा रात्री जनावरे चोरी गेल्याची माहिती त्यांनी रईस यांना दिली. त्यामुळे रात्री कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी गावातील जनावरे चोरी करून नेल्याचे स्पष्ट झाले. 


पोलिसात गुन्हा दाखल...


रईस यांच्यासह गावातील ज्यांची जनावरे चोरीला गेली आहेत, त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र त्यांना आपली जनावरे आढळून आली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांनतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर जनावरे चोरणारे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय असून, त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहे. 


पहा व्हिडिओ: जनावरे चोरणारे टोळी सीसीटीव्हीत कैद..