Aurangabad Crime News: औरंगाबादकरांनो आपली मोटारसायकल सांभाळा असे म्हणण्याची आता वेळ आली आहे. कारण गेल्या दहा वर्षात औरंगाबाद शहरातून 8 हजार तर गेल्या सात महिन्यात जिल्ह्यातून 446 दुचाकी चोरीला गेल्या आहेत. विशेष म्हणजे 446 मधून फक्त 136 दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. त्यामुळे सर्वसामन्यांनी आपल्या दुचाकीची काळजी घेण्याची वेळ आली आहे. 

औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला आहे. विशेष म्हणजे अनेकदा चोर सीसीटीव्हीत कैद सुद्धा होतात. मात्र त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे. शहरात रोज दोन ते तीन दुचाकी चोरीला जातात. मात्र गुन्हे उघड होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. अनेकदा जिल्ह्याबाहेरील आरोपी शहरात येऊन चोरी करून जात असल्याने त्यांना शोधणे पोलिसांसाठी अडचणीचे जाते. 

मराठवाड्यात सात महिन्यात 1403 दुचाकी चोरीला... (1 जानेवारी ते 31 जुलै 2022)

अ.क्र. जिल्हा  गुन्हे दाखल  गुन्हे उघड 
  औरंगाबाद  446 136
  बीड  273 54
  नांदेड  119 54
  जालना  197 87
  उस्मानाबाद  117 22
  परभणी  110 57
  लातूर  61 73
  हिंगोली  06 21
एकूण -- 1403 483

नागरिकांनी काळजी घ्यावी...

अनेकदा दुचाकी चालकांच्या निष्काळजीपणामुळे दुचाकी चोरांना आयती संधी मिळून जाते. त्यामुळे नागरिकांनी आपली दुचाकीची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी दुचाकी उभी करतांना हँडल लॉक केली पाहिजे. तसेच सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी गाडी उभी केली पाहिजे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी साखळीने दुचाकीला कुलप लावला पाहिजे. या सर्व गोष्टी केल्यास दुचाकी चोरी मोठ्याप्रमाणावर रोखता येणे शक्य असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.