Aurangabad Crime News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी एकत्र बसले असतानाच झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. माझ्या दाढीला हात का लावला यावरून दोन्ही मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर काही तासाच्या आत आरोपीला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल उर्फ सांडु कम्मा शेख (वय-35 वर्ष रा.पिंपळवाडी पिराची ता.पैठण) आणि रामेर उर्फ राम गजेसिंग बोत (वय-38 वर्ष रा. साखर कारखाना कॉलनी एमआयडीसी ता. पैठण) दोघेही मित्र आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघेही पैठण-औंरगाबाद महामार्गावरील एका हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी गेले होते. मात्र याचवेळी राम बोत याच्या दाढीला मयत सांडु शेख याने हात लावला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
वाद एवढ्या विकोपाला गेला की, राम याने बाजूला असलेल्या अंडा आम्लेटच्या दुकानात असलेल्या कांदा कापण्याच्या चाकुने सांडू याच्या पाठीमध्ये दोन वार केले. यामध्ये सांडू हा गंभीर जखमी झाला असल्याने, प्रथमोपचार करून त्याला औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आरोपीला उसाच्या शेतातून केली अटक...
घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांच्यासह सपोनि भागवत नागरगोजे पोलीस पथकाने धाव घेतली. तर खुन केल्यानंतर आरोपी राम हा फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्याचा शोध सुरु केला. यावेळी तो ईसारवाडी शिवारातील एका ऊसाच्या शेतात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एमआयडीसी पैठण पोलिसांना त्याची खबर मिळताच त्यांनी आरोपी राम याला अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ शफिक शेख यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल चालकही जखमी...
सांडु आणि राम दोघेही एका हॉटेलमध्ये भजे खात बसले होते. दोघांमध्ये यावेळी गप्पागोष्टी सुरु होत्या. याचवेळी सांडू याने रामच्या दाढीला हात लावला आणि वादाला सुरवात झाली. रागाच्या भरात रामने कांदा कापण्याचा चाकू घेऊन सांडूवर हल्ला केला. यावेळी हॉटेल चालकाने तत्काळ मध्यस्थी करत त्याला थांबवण्याचा पप्रयत्न केला. यादरम्यान हॉटेल चालकाच्या हाताला सुद्धा चाकू लागल्याने जखम झाली. मात्र चाकू तीक्ष्ण असल्याने दोन वारमध्येच सांडू जागेवर कोसळला.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: खासदार फौजिया खान यांच्या घरी चोरी; पोलिसांकडून तपास सुरु