Aurangabad Crime News: औरंगाबाद ग्रामीणच्या कन्नड शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत, घरात तब्बल 37 किलो गांजा लपवुन ठेवणाऱ्या एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहे. कन्नड शहरातील पांढरी मोहल्ला परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, अकबर चाँदसाब रंगरेज (रा. पांढरी मोहल्ला) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड शहर येथील पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती की, कन्नड शहरातील पांढरी मोहल्ला परिसरात एका व्यक्तीने त्याच्या राहत्या घरात गांजा चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने लपवुन ठेवलेला आहे. तसेच त्याची तो अवैधरित्या विक्री करत आहे. यावरून कन्नड शहर पोलीसांच्या पथकाने पांढरी मोहल्ला, कन्नड शहर परिसरात सापळा लावून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित व्यक्ती अकबर चाँदसाब रंगरेज यास ताब्यात घेतले. 


पोलिसांनी अकबर याला विचारपुस केली असता, त्याने पोलीसांना उडवा उडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा अधिक संशय आला. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, याठिकाणी दोन किलो, सत्वादोन किलो असे वजनाचे 17 पॅकटेमध्ये 37 किलो गांजा हा दडवून ठेवलेला होता. तसेच गांजाची चोरटी विक्रीच्या माध्यमातुन मिळालेले रोख रक्कम 1 लक्ष 28 हजार असा, एकुण 3 लाख 59 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांनतर पोलिसांनी अकबर याच्या विरोधात अंमली पदार्थ गांजाची विक्रीसाठी साठा करून त्याची अवैधरित्या चोरटी विक्री करतांना मिळून आला म्हणुन गुन्हा दाखल करून, अटक केली आहे. 


पोलिसांकडून तलवारी जप्त...


औरंगाबाद शहर पोलिसांनी तलवारी घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती तलवारी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळ लावत हातात पांढरी गोणी घेऊन येणाऱ्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी वैभव अशोक शेजूळ नावाच्या त्या व्यक्तीकडे दोन तलवारी आढळून आल्या आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.